विशेष – बहुगुणी कलाकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>दिलीप ठाकूर

चित्रपट, नाटक, मालिका या विविध माध्यमांतून विविधरंगी व्यक्तिरेखा अजरामर करणारे बहुरूपी आणि बहुगुणी कलाकार म्हणजे अशोक सराफ. 4 जून 2022 रोजी ते वयाची पंचाहत्तरी पूर्ण करीत आहेत. कलाकार आणि माणूस या दोन्ही भूमिकांमध्ये ते मोठे आणि वेगळे व्यक्तिमत्त्व आहे. वयाची पंचाहत्तरी पूर्ण करीत असतानाच त्यांनी अभिनय क्षेत्रातील पन्नास वर्षेही पूर्ण केली. मुख्य म्हणजे या प्रदीर्घ प्रवासात चित्रपट निर्मितीचे बदलते तंत्र, मानसिकता आणि महत्त्वाचे म्हणजे माणसं या सगळय़ांसोबत त्यांनी स्वतःला अपडेट ठेवले आहे.

‘पांडू हवालदार’च्या यशानंतर महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला जाताना सेकंड क्लासमध्ये दोन खरे हवालदार भेटले तोही त्यांचा एक कम्माल अनुभव. पूर्वी मराठी चित्रपट कलाकार एशियाड बसने पुण्याला जात, तर महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या सेकंड क्लासने कोल्हापूरला ये-जा करीत. एकतर त्यात त्यांना अजिबात वावगं असं काही वाटत नव्हतं आणि मराठी चित्रपटसृष्टी गरीब असेच मानले जाई, पण असेच एकदा जात असताना सेकंड क्लासमधील अशोक सराफला पाहून दोन खरे हवालदार चुळबुळ करू लागले. ‘‘हा ‘पांडू हवालदार’मधील ‘सखाराम हवालदार’ आहे वाटते?’’ एकाने विचारले. दुसरा ‘‘हो’’ म्हणाला आणि हे ऐकून अशोक सराफ यांनी डोक्यावर जी चादर घट्ट लपेटून घेतली ती कोल्हापूर स्टेशनला पोचल्यावर काढली.

अशोक सराफ लहानपणी ग्रॅण्ट रोडच्या  चिखलवाडीत राहायचे तेव्हाची गोष्ट. त्यांच्या घरासमोरच सुनील गावसकरही राहायचा. दोघेही लहान वयाचे आणि त्या काळात गल्ली क्रिकेटचा फंडा गल्लोगल्ली होता आणि अशातच हे दोघे लहानपणी  क्रिकेट खेळलेत. इतकेच नव्हे, तर एक दोन बालनाटय़ात या दोघांनी एकत्र भूमिका साकारलीय. त्या आठवणी अशोक सराफ आजही आवर्जून सांगतात. आता हेच अशोक सराफ वयाची पंचाहत्तरी पूर्ण करीत आहेत. त्यांचा जन्म 4 जून 1947 चा. त्यांचा फिटनेस, चापल्य, कामाचा झपाटा पाहता ते पंचाहत्तरीचे वाटत नाहीत. आपल्या कामाचा आपण आनंद घेत असतानाच तो इतरांनाही द्यावा ही त्यांची वृत्ती मी अनेक वर्षे पाहतोय.

अशोक सराफ यांच्या चित्रपट, रंगभूमी, मालिका या तीनही माध्यमांतील अष्टपैलू, चौफेर वाटचालीवर थोडक्यात फोकस टाकता येणं अवघड. अशोक सराफ म्हणजे एक आदर्श व्यक्तिमत्त्व आणि अभिनयाची जणू एक संस्था. विशेष म्हणजे कायमच जमिनीवर पाय असलेले सद्गृहस्थ. ‘विनोदी अभिनेता’ असा त्यांच्यावर बसलेला शिक्का मला व्यक्तिशः मान्य नाही. कोणत्याही चौकटीत न राहिलेला असा ‘बहुरूपी’ आणि ‘बहुगुणी’ अभिनेता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी नायक, खलनायक, विनोदी अभिनेता, चरित्र भूमिका अशी विविधरंगी वाटचाल करीत मोठा पल्ला गाठला आहे.

काही विशेष गोष्टी सांगायच्या तर फार पूर्वी ‘संशयकल्लोळ’च्या  विशेष प्रयोगाला दिलीप कुमारने दिलेली शाबासकी आजही त्यांना आठवतेय. अशोक सराफ यांना कारकीर्दीच्या सुरुवातीलाच हा योग आला. त्यामुळे तर त्या शाबासकीची आठवण आणि ओलावा फारच जिव्हाळय़ाचा. ही आठवण सांगताना कळत नकळतपणे त्याला आजही दिलीप कुमारचा स्पर्श जाणवतोय/सुखावतोय असा त्यांचा फील असतो.

नुकतेच आम्ही ‘प्रवाह पिक्चर’च्या पार्टीत भेटलो, तेव्हाही त्यांचा तोच फिटनेस आणि नेहमीच्या आपुलकीने गप्पा. या सगळ्यात पहिली भेट केव्हाच मागे पडली, तरी सांगतो. ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला मी ‘नवशक्ती’ दैनिकात रुजू झालो त्यावेळी रविवारच्या अंकात अशोक सराफ वाचकांच्या गमतीदार प्रश्नांना तिरकस उत्तरे देई. फार पूर्वी ‘रसरंग’ साप्ताहिकात शरद तळवळकर, ‘झूम’ पाक्षिकात निळू फुले, ‘चित्रानंद’ साप्ताहिकात दादा कोंडके अशी उत्तरे देण्याची सदरे असत. असेच हे सदर होते आणि मी गिरगावात राहत असल्याने मला चिखलवाडीत जाणे जवळ असल्याने एकदा मी ती उत्तरे आणायला गेलो. अशोक सराफ दूरचित्रवाणीवर क्रिकेट सामना पाहण्यात रमले होते. तरी त्यांनी माझी छान विचारपूस केली आणि मग कधी मराठी चित्रपटाच्या सेटवर, पार्टीत, कोल्हापूरला वगैरे वगैरे सतत आमच्या भेटी सुरू झाल्या. तसे अशोक सराफ खूपच नेमके अथवा कमी बोलतात. त्यांना बोलते करणे अवघड, पण एकदा का त्याचे जुने संदर्भ दिले की, ते खुलतात. अशाच त्यांच्या काही खास गोष्टी म्हणजे 1979 साली वर्षातील सगळे म्हणजे 365 दिवस त्यांनी कोल्हापुरात शूटिंग केले. हे त्यांनीच एकदा सांगितले. त्या काळात कोल्हापुरात खूपच मोठय़ा प्रमाणात मराठी चित्रपटांचे शूटिंग होत असे. ‘सगेसोयरे’, ‘गुलछडी’, ‘ठकास महाठक’, ‘रामराम गंगाराम’ इत्यादी अनेक चित्रपटांचे कोल्हापूरला शूटिंग केले. राजकमल कलामंदिर निर्मित (युवा विभाग) ‘अशीही बनवाबनवी’च्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यास चित्रपती व्ही. शांताराम आणि दिलीप कुमार यांचे आशीर्वाद त्यांना लाभले. जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा इव्हेन्ट रंगला. मीदेखील तो अनुभवला. अशोक सराफसाठी अतिशय भारावून जाणारा क्षण होता तो. विशेष म्हणजे शशांक उदापूरकर दिग्दर्शित ‘प्रवास’ या चित्रपटात अशोक सराफ यांची व्यक्तिरेखा दिलीप कुमारच्या अभिनयाची जबरदस्त चाहता अशी आहे. सतत दिलीप कुमारचे जुने चित्रपट पाहणे, त्याचे कौतुक करणे आणि आपण चित्रपट कलाकार होऊ शकलो नाही याचे दुःख विसरणे अशीच ती व्यक्तिरेखा आहे.

अशोक सराफ यांचा ‘बहुरूपी’मधील सावळ्य़ा… अत्यंत गरीब, बायकोचे अकाली निधन झालेलं आणि पाच वर्षांच्या मुलाच्या औषधोपचारांसाठी पैसा नाही म्हणून दारोदार हिंडतो. दुर्दैवाने मूल दगावते आणि सावळय़ा विविध सोंगे घेऊन बहुरूप्याचा धंदा करतो. ‘बिनकामाचा नवरा’मधील तुका हा कमालीचा इरसाल. ‘सगेसोयरे’मध्ये दुहेरी भूमिका, बाप बेवडा तर मुलगा दारूला स्पर्श न करणारा. ‘गुलछडी’मधला मातापित्याच्या खुनाचा सूड घेणारा नायक, प्रसंगी तो लुगडंही नेसतो. ‘हेच माझे माहेर’मधील कन्नड भाषिक, ‘रामराम गंगाराम’मधील म्हमद्या खाटीक, ‘अरे संसार संसार’मधील धनलोभी, स्त्राrलंपट सावकार, ‘कशाला उद्याची बात’मधील अत्यंत लाचार, अगतिक विमा एजंट, ‘गुपचूप गुपचूप’मधील प्रोफेसर धोंड, ‘गोंधळात गोंधळ’मधील पॅन्टवाला मदन वगैरे अगणित व्यक्तिरेखा त्यांनी साकारल्या. रंगभूमीवरील त्यांच्या भूमिकांचे प्रगती पुस्तक असेच चांगल्या गुणांचे आहे. पत्नी निवेदिता आणि आपल्या मुलासोबत कुटुंबात रमत आपल्या कामाचा आनंद ते घेत आहेत. या सकारात्मक केमिस्ट्रीमुळेच ते कायमच वर्तमानकाळात वावरत पुढे चालले आहेत.

या चौफेर प्रवासात रसिकांचे, चाहत्यांचे अफाट प्रेम त्यांना मिळतेय. त्यांनी एकदा सांगितलेला एक अनुभव भन्नाटच आहे.  ‘रामराम गंगाराम’मधील त्यांनी साकारलेला म्हमद्या ग्रामीण भागात दूरवर लोकप्रिय झाला. तेव्हा श्रीरामपूर येथे ‘दिल्या घरी तू सुखी रहा’ या नाटकाच्या प्रयोगात अशोक सराफ रंगमंचावर असतानाच आठ दहा खाटीक नाटय़गृहात शिरले. सर्वजण लुंगीत होते आणि अंगावर एक रक्ताचे असंख्य डाग असलेला गंजीफ्रॉक. फक्त त्यांच्या हातात सुरे नव्हते. त्यांना अशोक सराफ यांचा सत्कार करायचा होता. कारण काय तर तो त्यांना आपल्या व्यवसायातील वाटत होता. मग काय विचारता? मध्यांतरात त्यांना त्याच रूपात स्टेजवर बोलावले, एकाने जोरदार भाषण ठोकले आणि सत्कार सार्थकी लागला.

चित्रपट, नाटक, मालिका या विविध माध्यमांतून विविधरंगी व्यक्तिरेखा अजरामर करणारे बहुरूपी आणि बहुगुणी कलाकार म्हणजे अशोक सराफ. 4 जून 2022 रोजी ते वयाची पंचाहत्तरी पूर्ण करीत आहेत. अर्थात या वयातही त्यांची चांगल्या भूमिकांची भूक कायम आहे. कारण त्यांचा जीवन जगण्याचा सकारात्मक दृष्टिकोन कायम आहे. कलाकार आणि माणूस या दोन्ही भूमिकांमध्ये ते मोठे आणि वेगळे व्यक्तिमत्त्व आहे. वयाची पंचाहत्तरी पूर्ण करीत असतानाच त्यांनी अभिनय क्षेत्रातील पन्नास वर्षेही पूर्ण केली. मुख्य म्हणजे या प्रदीर्घ प्रवासात चित्रपट निर्मितीचे बदलते तंत्र, मानसिकता आणि महत्त्वाचे म्हणजे माणसं या सगळय़ांसोबत त्यांनी स्वतःला अपडेट ठेवले आहे. त्यांची ही वाटचाल अशीच पुढे चालू राहो आणि वयाची शंभरी ते पार करोत याच शुभेच्छा!

(लेखक ज्येष्ठ सिने समीक्षक आहेत.)

[email protected]