प्रवाशांना फटका! मध्य रेल्वेवर एसी लोकलच्या 14 फेऱ्या रद्द

मध्य रेल्वे मार्गावरील एसी लोकलच्या 14 फेऱ्या बुधवारी अचानक रद्द करण्यात आल्या. प्रवाशांना याबाबत कोणतीही पूर्वकल्पना नसल्यामुळे प्लॅटफॉर्मवर एसी लोकलच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांचा चांगलाच गोंधळ उडाला. मध्य रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या दररोज 56 फेऱया होतात. एसी लोकल ठरावीक वेळेत असल्यामुळे ही लोकल पकडण्यासाठी प्रवाशांना नियोजित वेळेत प्लॅटफॉर्मवर पोहोचावे लागते, मात्र अचानक एसी लोकल रद्द झाल्यामुळे प्रवाशांवर सामान्य लोकलने प्रवास करण्याची वेळ आली. रेकची उपलब्धता नसल्यामुळे मध्य रेल्वे मार्गावर बुधवारी एसी लोकलच्या 14 फेऱया रद्द कराव्या लागल्या. मात्र प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून या वेळेत सामान्य लोकल सोडण्यात आल्या, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱयांनी दिली.