वाहनाच्या धडकेत दहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाहनाच्या धडकेत दहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना विलेपार्ले परिसरात घडली. प्रथमेश परमार असे या मुलाचे नाव असून अपघातानंतर त्याची चार दिवसांनी ओळख पटली. अपघातप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हय़ाची नोंद करून तपास सुरू केला आहे.

प्रथमेश हा त्याच्या वडिलांसोबत राहत होता. त्याच्या वडिलांना लॉकडाऊन काळात गोवा येथे वाहन चालकाची नोकरी लागल्याने त्यांनी प्रथमेशला कांदिवलीच्या समतानगर येथे एका मित्राच्या घरी राहण्यास ठेवले होते. गोव्यात लॉकडाऊन उघडल्यानंतर प्रथमेशला त्याचे वडील गोव्याला घेऊन जाणार होते. चार दिवसांपूर्वी प्रथमेश हा रात्री अचानक घरातून निघून गेला. रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने तो बेपत्ता असल्याची तक्रार समतानगर पोलीस ठाण्यात दाखल केली. सोमवारी रात्री सवाबाराच्या सुमारास प्रथमेश हा पश्चिम द्रुतगती महामार्गावरील पटरा गेट क्रॉस करत होता. तेव्हा भरधाव वेगातील वाहनाने त्याला धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला. पोलिसांनी प्रथमेशला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.