
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेतील 50 टक्के उपस्थितीची अट रद्द करून शिक्षकांंना वर्क फ्रॉम होमची परवानगी द्या, अशी मागणी राज्य शिक्षक सेना कोकण विभागाने केली आहे.
ठाणे जिल्ह्यातील काही शाळांमध्ये 50 टक्के उपस्थितीचा मुद्दा पुढे करून शिक्षकांना बोलवले जाते. यामुळे बऱ्याच शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षक सेना कोकण विभागाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे, उपाध्यक्ष गोकुळ पाटील यांनी याविषयी ठाणे जिह्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे तर बारावीची परीक्षा पुढे ढकलली आहे. तसेच पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात आपापल्या स्तरावर वर्गोन्नतीचे आदेश दिले आहेत. सद्य स्थितीत शाळा-कॉलेजे बंद आहेत. तरीदेखील काही शाळा-कॉलेजमध्ये शिक्षकांना बोलवले जात आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून शिक्षक सेनेने वर्क फ्रॉम होमची मागणी केली आहे.



























































