
सामना प्रतिनिधी। मुंबई
बहुजन वंचित आघाडीची स्थापना करण्यात आली त्यावेळी झालेल्या सभेला प्रचंड गर्दी होती. आताही सभेला चांगली गर्दी होत आहे. परंतु, या गर्दीचे मतांमध्ये रूपांतर होणार का असा खोचक सवाल केंद्रिय मंत्री आणि रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले गट)चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना केला आहे.
बहुजन वंचित आघाडीचा आरपीआयवर (आठवले गट) परिणाम होणार नाही, असेही आठवलेंनी म्हटले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आंबेडकर यांना टोला लगावला आहे.
2004 मध्ये शिर्डीत आपला पराभव करण्यासाठी काँग्रेसने षड्यंत्र रचले होते. काँग्रेस-राष्ट्रवादीने नेहमी दलित मतांचा वापर केला. त्यामुळेच आम्ही युतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता असे ते म्हणाले.
मी सरकारच्या विरोधात नाही
मी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस सरकारच्या विरोधात नाही. परंतु, युतीत आमच्या पक्षाला किमान एक जागा द्यावी. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढेल, असेही आठवले म्हणाले. 2014 मध्ये भाजपाने युतीतील छोटय़ा पक्षांना चार जागा दिल्या. यात आरपीआयला सातारा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला हातकणंगले आणि माढा तसेच राष्ट्रीय समाज पक्षाला बारामतीची जागा दिली होती. अशी आठवण सांगत दोन्ही सरकारने आमच्या सर्व मागण्या मान्य केल्याचे त्यांनी सांगितले.



























































