
शम्स मुलानी आणि तनुष कोटियनच्या फिरकीपुढे हैदराबादने शरणागती पत्करली. मुंबईने हैदराबादचा पहिला डाव 214 धावांवर गुंडाळून त्यांच्यावर फॉलोऑन लादला आणि 437 धावांची प्रचंड आघाडी मिळविली. त्यानंतर पुन्हा फलंदाजीला आलेल्या हैदराबादचा दुसरा डावही 220 धावांत संपुष्टात आणत मुंबईने रणजी करंडक स्पर्धेत सलग दुसऱया विजयाची नोंद केली. पहिल्या डावात 651 धावांचा डोंगर उभारणाऱया मुंबईने तिसऱया दिवशीच सामना संपवला. आता मुंबई दोन विजयांमुळे 13 गुणांसह ‘ब’ गटात अव्वल स्थानावर पोहोचला आहे.
कालच्या 6 बाद 173 वरून पुढे खेळ सुरू करणाऱया हैदराबादचा डाव फार लांबला नाही. शम्स मुलानी आणि तनुष कोटियनने उर्वरित 4 फलंदाज 41 धावांत बाद केले आणि हैदराबादवर फॉलोऑन लादला. बुधवारी 72 धावांवर नाबाद असलेला रोहित रायुडू केवळ एका धावेची भर घालू शकला. तसेच बुधवारी 5 विकेट घेणाऱया मुलानीने डावांत 94 धावांत 7 विकेट बाद केले तर कोटियनने 2 विकेट्स घेतल्या. त्यानंतर पुन्हा फलंदाजीला आलेल्या हैदराबादला तन्मय अगरवाल आणि अक्षत रेड्डीने 66 धावांची सलामी दिली, पण तनुष कोटियनने चार चेंडूंत दोघांना बाद केले. त्यानंतर राहुल बुद्धी (65) आणि तनय त्यागराजन (नाबाद 39) यांनी हैदराबादला सावरण्याचा प्रयत्न केला, पण मुलानी-कोटियनच्या फिरकीपुढे कुणाचाही निभाव लागला नाही. त्यामुळे हैदराबादचा दुसरा डाव 220 धावांवर संपला. मुलानीने दुसऱया डावांत 4 विकेट घेत सामन्यात 178 धावांत 11 विकेट घेतल्या. दुसऱया डावात तनुषने जोरदार गोलंदाजी करीत 82 धावांत अर्धा संघ बाद केला.
गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेशचे विजय
रणजी करंडकाच्या एलिट गटात कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, मिझोरम या संघांनी डावांनी विजय मिळविले तर गुजरात, मेघालय यांनी दमदार विजयाची नोंद केली. आज गुजरातने जम्मू आणि कश्मीर संघाचा 9 विकेट्सनी पराभव केला. कर्नाटकने पुदुचेरीचा डाव आणि 7 धावांनी नमवले. मिझोरमनेही अरुणाचल प्रदेशचा दुसरा डाव 157 धावांत गुंडाळून डाव आणि 118 धावांनी दणदणीत विजय मिळविला. मेघालयानेही सिक्कीमवर दहा विकेट राखून मोठय़ा विजयाची नोंद केली. उत्तर प्रदेशनेही नागालॅण्डविरुद्धच्या सामन्यात डाव आणि 230 धावांचा मोठा विजय प्राप्त केला. मध्य प्रदेशने चंदिगडचे दोन्ही डाव 57 आणि 127 धावांत गुंडाळून डाव आणि 125 धावांच्या विजयाची नोंद केली. मध्य प्रदेशने सलग दुसरा सामना डावाने जिंकत 14 गुणांसह ‘ड’ गटात अव्वल स्थान पटकावले आहे.




























































