
बेस्टच्या ताफ्यात आता आणखीन 40 इलेक्ट्रिक बसेस येणार आहेत. केंद्र सरकारच्या ‘फेम’ फेज-2 योजनेअंतर्गत या बसेससाठी सबसिडी देण्यात आलेली आहे. बेस्टने अलिकडे 300 इलेक्ट्रीक बसेसच्या खरेदीला मंजूरी दिली होती. त्याव्यतिरिक्त या 40 बसेस केंद्र सरकारकडून मिळणार आहेत. बेस्टच्या ताफ्यात सध्या 38 इलेक्ट्रीक बसेस धावत असून त्यातील 6 बेस्टच्या मालकीच्या असून 32 भाडे तत्वावरील आहेत.
पर्यावरण संवर्धनासाठी प्रदुषणमुक्त इलेक्ट्रीक बसेसला चालना मिळावी यासाठी केंद्र सरकारने ‘फेम’ योजना आखली आहे. या योजनेच्या फेज-2 अंतर्गत बेस्टला 40 इलेक्ट्रीक बस मिळणार आहेत. या बसेस सबसिडी अंतर्गत पेंद्र सरकार पुरविणार आहे. बेस्टने अलिकडेच 300 इलेक्ट्रीक बसेसच्या खरेदीला मंजूरी दिली असून सध्या बेस्टकडे 38 इलेक्ट्रीक बस आहेत. त्यातील 32 बसेस भाडय़ाच्या तर 6 बसेस बेस्टच्या मालकीच्या आहेत. तर 40 नॉन एसी मिडी,160 मिडी एसी, 140 सिंगल डेकर एसी बसेस आहेत. बेस्टकडे मालकीच्या 3,337 बसेस असून पालिकेच्या मदतीने भाडेतत्वावर आणखी घेण्यात येणार असून एकूण ताफा 6,447 पर्यंत वाढविण्याची बेस्टची योजना आहे.
एसटीला 100 इलेक्ट्रीक बस मिळणार
केंद्र सरकारच्या फेम फेज-2 योजनेनुसार महाराष्ट्राला एकूण 240 इलेक्ट्रीक बस मिळणार आहेत. त्यातील 100 एसटी महामंडळाच्या ताफ्यात येणार असून 40 बेस्टला तर 100 बसेस नवीमुंबईसाठी मिळणार आहेत. एसटी महामंडळात काही वर्षांपूर्वी दाखल झालेल्या पहिल्या इलेक्ट्रीक बस शिवाईचा प्रवास अद्यापही चार्जिंग स्टेशन अभावी सुरू झालेला नाही. ही बस पुणे ते नागपूर, नाशिक, संभाजीनगर या मार्गांवर चालविण्यात येणार होती. या बसेसच्या चार्जिंग पॉईंटसाठी महाराष्ट्र वीज मंडळकडून वीज पुरविण्याचे काम देण्यात आले होते. परंतू कोविड-19 मुळे हे काम प्रचंड रखडले आहे.



























































