आजपासून 244 ठिकाणी मोफत टेस्ट, महापालिकेचा कोरोनावर अखेरचा घाव!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
corona

मुंबईत नियंत्रणात आलेल्या कोरोनाचे पूर्णपणे उच्चाटन करण्यासाठी पालिकेने ‘अखेरचा घाव’ घालण्यासाठी प्रभावी मोहीम हाती घेतली असून उद्या 2 नोव्हेंबरपासून पालिका क्षेत्रात तब्बल 244 ठिकाणी मोफत ‘कोरोना चाचणी’ आणि वैद्यकीय तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये आधीपासून उपलब्ध असणाऱया 54 खासगी कोरोना चाचणी सेंटरमुळे चाचण्यांच्या एकूण सेंटरची संख्या 300हून जास्त होणार आहे.

येथे संपर्क करा, तपासणी-चाचणी करून घ्या!

कोविडची लक्षणे असल्यास आपल्या घराजवळील ठिकाणांची माहिती विभागीय हेल्पलाईनद्वारे आणि ‘1916’ या दूरध्वनी क्रमांकाद्वारेही मिळू शकणार आहे. याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे  http://stopcoronavirus.mcgm.gov.in या स्वतंत्रपणे सुरू करण्यात आलेल्या समर्पित संकेतस्थळावरदेखील ही माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी मुंबईकरांनी कोणतीही लक्षणे, शंका असल्यास वरील सुविधांवर संपर्क करून तपासणी-चाचणी करून घ्यावी असे आवाहन पालिकेने केले आहे.

आता सुमारे 150 चाचणी-तपासणी केंद्रे वाढवल्याने प्रत्येक विभागात 10 ते 12 केंद्रे उपलब्ध होणार.

सुधारित शासकीय दरांनुसार घरी येऊन वैद्यकीय चाचणी करण्यासाठी रुपये 1800 तर प्रयोगशाळेतील चाचणीसाठी 1400 शुल्क आकारले जाईल.

याआधी पालिकेच्या माध्यमातून सुमारे 100 कोरोना चाचणी केंद्रांवर आणि 54 खासगी केंद्रांवर कोरोना चाचणी केली जात होती.

‘वॉक इन’ पद्धतीने सुविधा

तपासणी-चाचणीची सुविधा दररोज सकाळी 10 ते 12 या कालावधीदरम्यान सदर 244 ठिकाणी थेट म्हणजेच ‘वॉक इन’ पद्धतीने उपलब्ध असणार आहे. यापैकी काही ठिकाणी आरटीपीसीआर पद्धतीची चाचणी तर काही ठिकाणी अँटिजन प्रकारची कोरोना चाचणी होणार आहे. या नव्या चाचणी केंद्रांमुळे पालिकेची 244, खासगी 54 आणि राज्य व केंद्र सरकारच्या अखत्यारीतील मिळून 300 पेक्षा जास्त चाचणी केंद्रे पालिका क्षेत्रात उपलब्ध होणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.