फक्त लक्ष्मीपूजनाला फटाके वाजवा; तेही बिनआवाजाचे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना नियंत्रणात आला असला तरी खबरदारीचा उपाय म्हणून आणि श्वसनाशी सर्वात जास्त संबंध असणाऱया ‘कोविड’ला रोखण्यासाठी पालिकेने या वर्षी दिवाळीत मुंबईमध्ये फटाके पह्डण्यास बंदी घातली आहे. याला मुंबईकरांनी सहकार्य करण्याचे आवाहन करतानाच फक्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फुलझडी, अनार असे छोटे फटाके खबरदारी घेऊन पह्डण्यास परवानगी देण्यात आली आहे. हे नियम मोडणाऱयांवर पालिका आणि पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेले आहे.

मुंबईत मार्चमध्ये शिरकाव केलेला कोरोना आता मात्र पूर्ण नियंत्रणात आला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90 टक्क्यांवर गेले आहे. असे असले तरी दीपावलीच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी आणि फटाक्यांची आतषबाजी लक्षात घेता पालिकेने कडक नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये कोरोना रुग्णांना फटाक्यांचा त्रास होण्याची शक्यता सर्वाधिक असल्यामुळे पालिकेने सार्वजनिक आणि खासगी परिसरात फटाके पह्डण्यास बंदी घालण्यात आली आहे. फटाक्यांची, तत्सम प्रकारची कोणतीही आतशबाजी करता येणार नसल्याचे पालिकेने जाहीर केले आहे. असे असले तरी 14 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोसायटी-घराचे अंगण अशा खासगी परिसरात सौम्य स्वरूपाच्या फटाक्यांमधील फुलबाजी, अनार (कोठी/झाड) यासारखे फटाके पह्डता येतील. मात्र हे करीत असताना नागरिकांना कोविडविषयक सर्व प्रकारची काळजी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

काळजी घ्या, नियमावली पाळा!

  • सोशल डिस्टन्सिंग पाळणे, साबणाने हात स्वच्छ धुणे, मास्क वापरणे.
  • सॅनिटायझर ज्वलनशील असल्यामुळे फटाके लावताना वापर नको.
  • याप्रसंगी सॅनिटायझरऐवजी साबणाचा वापर करावा.
  • पाण्याची बादली, सुती रूमाल सोबत ठेवावा.
  • रांगोळीसोबत पाण्याची बादली, साबण दरवाजाजवळ ठेवावा.

”सद्यस्थितीत कोरोना आटोक्यात आला असला तरी गर्दी वाढल्यास आणि खबरदारी नाही घेतली तर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. हा धोका टाळून आपल्या मुंबईला वाचवण्यासाठी या वर्षी फटाकेमुक्त दिवाळी साजरी केली पाहिजे. गर्दी टाळून कोविड संबंधित काळजी घेतली पाहिजे.” – इकबाल सिंह चहल, पालिका आयुक्त

ऑनलाइन भाऊबीजला प्राधान्य द्या!

कोरोनाचा प्रभाव असल्यामुळे या वर्षी गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी. नातेवाईक-दुसऱयांच्या घरी जाणे टाळावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. दिवाळीत महत्त्वाचा सण असलेली भाऊबीज साजरी करताना ‘ऑनलाइन व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे ओवाळावे आणि भावानेदेखील ऑनलाइन पद्धतीनेच ओवाळणी द्यावी असे आवाहन पालिकेने केले आहे.