गळती थांबणार, इमारतींचे आयुष्य वाढणार; इमारतींच्या गच्चीवर पत्राशेड बांधता येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिका क्षेत्रातील ‘म्हाडा’सह इतर सर्व इमारतींच्या गच्चीवर पत्राशेड बांधण्यास लवकरच परवानगी मिळणार आहे. यामुळे इमारतींना पावसाळ्यात लागणारी गळती थांबणार असल्याने इमारतींचे आयुष्यही वाढणार आहे. याबाबत पालिका प्रशासनाने धोरण तयार केले असून महापौरांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. शिवसेना आमदार अजय चौधरी गेल्या तीन वर्षांपासून याबाबत पालिका, प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे.

मुंबईत ‘म्हाडा’सह इतर अनेक इमारतींना पावसाळ्यात छपरावरून गळती लागत असल्याने रहिवाशांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागतो. शिवाय गळतीमुळे इमारतीचे बांधकाम जीर्ण झाल्याने दुर्घटना होऊन जीवित-वित्तहानी होण्याचा धोका असतो. ‘म्हाडा’च्या अनेक इमारतींत असे गळतीचे प्रकार नियमितपणे सुरू असतात. त्यामुळे अनेकजण प्लॅस्टिक टाकून हा त्रास थांबवण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र हा उपाय परिणामकारक नसल्याने समस्या कायमस्वरूपी दूर होत नाही. त्यामुळे इमारतीच्या गच्चीवर पत्राशेड बांधण्याची परवानगी रहिवाशांकडून मागितली जात होती, मात्र पालिकेचे धोरण नसल्याने अशी परवानगी दिली जात नव्हती. या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी पाठपुरावा केला. याबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी धोरणावर चर्चा होऊन पालिका आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आले. यावेळी ‘म्हाडा’ सभापती विनोद घोसाळकर, बेस्ट समिती अध्यक्ष, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, पालिका उपायुक्त विजय बालमवार, मुख्य अग्निशमन अधिकारी हेमंत परब यांच्यासह अधिकारी हजर होते.

हजारो इमारतींना फायदा

 ‘म्हाडा’सह अनेक जुन्या इमारतींमध्ये पावसाळ्यात गळतीची समस्या निर्माण होते. त्यामुळे गच्चीवर पत्राशेड उभारल्यास मुंबईतील हजारो इमारतींना या धोरणाचा फायदा होणार आहे. लवकरच या धोरणाला मंजुरी मिळणार असल्याचे आमदार अजय चौधरी यांनी सांगितले.