
सामना प्रतिनिधी। मुंबई
मुलुंड येथे राहणाऱया एका 25 वर्षीय सीएने शुक्रवारी दुपारी वांद्रे-वरळी सी लिंकवरून समुद्रात उडी टाकल्याची घटना घडली. शुक्रवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बॅण्डस्टॅण्ड येथे त्याचा मृतदेह सापडला.
पार्थ सोमानी असे या सीएचे नाव असून तो मुलुंड येथील एका कंपनीत कामाला होता. कामानिमित्त तो वांद्रे येथे आला होता. तेथून त्याने मुलुंडला जाण्यासाठी टॅक्सी पकडली, पण वरळी येथे काम असल्याचे सांगून टॅक्सी वरळीला नेली. तेथून थोडय़ा वेळाने पुन्हा वांद्रे येथे काम असल्याचे सांगून टॅक्सी वांद्रे-वरळी सी लिंकवरून नेण्यास सांगितली. सी लिंकवर गेल्यानंतर हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगून पार्थने टॅक्सी थांबवण्यास सांगितली. चालकाने टॅक्सी थांबवताच पार्थ टॅक्सीतून बाहेर आला आणि थेट समुद्रात उडी टाकली. पार्थने समुद्रात उडी टाकल्याचे पाहून टॅक्सीचालकाने तेथून पळ काढला. दरम्यान, त्या परिसरातून जाणाऱया काही दुचाकीस्वारांनी पार्थला उडी टाकताना पाहिले आणि पोलिसांना याबाबत कळवले. पोलिसांनी अग्निशमन दल आणि स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने त्याचा शोध घेतला. दरम्यान, त्याने असे टोकाचे पाऊल का उचलले त्याबाबत समजू शकले नाही.



























































