दहा वर्षांनंतर होणार भटक्या कुत्र्यांची गणना, उपद्रव रोखण्यासाठी उपाययोजनांना गती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या दहा वर्षांपासून रखडलेली मुंबईतील भटक्या कुत्र्यांची गणना लवकरच करण्यात येणार आहे. यामुळे भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी मदत होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. या गणनेसाठी इंटरनॅशनल संस्थेची निवड करण्यात येणार आहे.

मुंबईत 2014 मध्ये भटक्या कुत्र्यांची गणना झाली होती. मात्र यानंतर गणना झाली नव्हती. कोरोना काळामुळेही ही गणना रखडली होती. त्यामुळे देशात काम करणाऱया ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल संस्थेच्या माध्यमातून पुन्हा एकदा जूनपासून भटक्या कुत्र्यांची जनगणना होणार आहे. या संस्थेने जूनपासून पुढील तीन ते चार महिन्यांत भटक्या कुत्र्यांची जनगणना करून अहवाल सादर करणे अपेक्षित आहे.

पाच वर्षांत साडेतीन लाख जणांना चावा

मुंबईत 2014 मध्ये मुंबई महापालिकेने ह्युमन सोसायटी ऑफ इंटरनॅशनल संस्थेच्या माध्यमातून श्वानांची जनगणना केली असता मुंबईत 2 लाख 96 हजार 221 भटके कुत्रे आढळले होते, मात्र सद्यस्थितीत मुंबईत भटक्या कुत्र्यांची संख्या नेमकी किती आहे याची गणना होणार आहे. दरम्यान, गेल्या पाच वर्षांत भटक्या कुत्र्यांनी साडेतीन लाख मुंबईकरांना चावा घेतल्याचे प्रकार समोर आले.

पाच वर्षांत कुत्रे चावल्याची आकडेवारी

2018 85,438
2019 74,279
2020 53,015
2021 61, 332
ऑगस्ट 2022 पर्यंत 50, 622