
मुंबईत कोरोना रुग्ण संख्या स्थिरावली असून गेल्या 24 तासांत लागण झालेल्या रुग्णांच्या तुलनेत तिप्पट बाधितांनी कोरोनावर मात केली. गेल्या एकाच दिवसात मुंबईत 6032 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 18 हजार 241 जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मुंबईत कोरोनाच्या तिसऱया लाटेत दैनंदिन रुग्णसंख्येने विक्रमी नोंद करीत थेट 20 हजारांचा टप्पा ओलांडल्याने मुंबईचे टेन्शन वाढले होते. मात्र गेल्या आठवडाभरापासून रुग्णसंख्या नियंत्रणात आली असून सद्यस्थितीत सहा हजारांवर स्थिरावली आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत करण्यात आलेल्या 60 हजार 291 चाचण्यांमधून हे बाधित आढळले आहेत. यातील 538 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यातील 103 जणांना ऑक्सिजनची गरज लागली.
डबलिंग रेट दोन महिन्यांवर
n मुंबईत तीन हजार दिवसांवर गेलेला रुग्ण दुपटीचा कालावधी 20 हजारांवर दैनंदिन रुग्णसंख्या गेल्याने थेट 45 दिवसांवर गेला होता. मात्र गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्या घटत असल्याने रुग्ण दुपटीचा कालावधी वाढत आहे. सद्यस्थितीत रुग्ण दुपटीचा कालावधी 66 दिवसांवर गेला आहे.
n रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने संपूर्ण कोरोना स्थितीत सुधारणा होत आहे. रुग्ण बरे होण्याचा कालावधी 85 टक्क्यांवरून 95 टक्के झाला असून रुग्णवाढीचा कालावधी 1.03 टक्क्यांवर आला आहे. मुंबईत सद्यस्थितीत एकूण 31856 सक्रिय रुग्ण आहेत.





























































