कोरोनाची इमारतींमध्येच नाकाबंदी, दहा दिवसांत एक हजार मजले सील!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत वाढणाऱ्या रुग्णसंख्येत चाळी-झोपडपट्टय़ांपेक्षा इमारतींमध्ये आढळणाऱ्या रुग्णांची संख्या 90 टक्क्यांहून जास्त असल्यामुळे पालिकेने इमारतींमधील प्रतिबंध कडक करताना दहा दिवसांत सुमारे एक हजार ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केली आहेत. गेल्या दहा दिवसांत 799 मजले, 83 इमारती आणि 16 कंटेनमेंट झोनची वाढ झाली आहे. यामुळे सद्यस्थितीत मुंबईत सील इमारतींची संख्या 228, सील मजले-भागांची संख्या 2815 आणि चाळी-झोपडपट्टय़ांमधील कंटेनमेंट झोनची संख्या 27 वर पोहोचली आहे.

मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर सुरुवातीच्या काळात दाटीवाटीच्या चाळी-झोपडपट्टय़ांमध्ये कोरोनाचा प्रसार झपाटय़ाने झाला. यामध्ये आशियातील सर्वात मोठय़ा धारावी झोपडपट्टीसह कुर्ला, वरळी-कोळीवाडा, मानखुर्द, गोवंडीसारख्या भागात कोरोना रुग्णांची वाढ झाल्याने ही ठिकाणे ‘कोरोना हॉटस्पॉट’ जाहीर करण्यात आली.

या ठिकाणचा कोरोना आटोक्यात आणताना पालिकेच्या चांगलेच नाकीनऊ आले. मात्र पुन्हा कोरोना रुग्णवाढ होत असताना चाळी-झोपडपट्टय़ांपेक्षा इमारतींमध्ये कोरोना रुग्ण जास्त आढळत आहेत. दैनंदिन रुग्णसंख्येत सर्वाधिक रुग्ण इमारतींमधील असल्याने पालिकेची चिंता वाढली आहे. 3 मार्च रोजी मागच्या आठ दिवसांतील इमारतींमधील सील मजल्यांची संख्या एक हजाराने वाढून ही संख्या 2016 वर पोहोचली होती. यावेळी प्रतिबंधित इमारती 145 होत्या. तर चाळी-झोपडपट्टय़ांमध्ये केवळ 11 कंटेनमेंट झोन होते.

कोरोना रोखण्यासाठी अशा होतायत उपाययोजना

सद्यस्थितीत आढळणाऱया रुग्णांमध्ये 90 टक्के कोरोना रुग्ण इमारतींमधील असल्याचे समोर आल्यामुळे इमारतींमध्ये राहणाऱया रहिवाशांसह ऑफिसमध्ये ये-जा करणारे, इमारतीत घरकाम करणाऱया महिला, मजूर, वृत्तपत्र-दूध विक्रेते यांच्या चाचण्या करण्यात येत आहेत. सोसायटी पदाधिकाऱयांच्या माध्यमातून घरी क्वारंटाइन असणाऱयांवर नजर ठेवली जात असून नियम मोडणाऱयांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. रुग्णाच्या निकट संपर्कातील लोकांमध्ये लक्षणे नसली तरी सातव्या दिवशी कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत.

साडेसात लाख मुंबईकर प्रतिबंधात

एखाद्या इमारतीत पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील करण्यात येत आहे. तर 2 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास तो मजला किंवा इमारतीचा भाग सील करण्यात येत आहे.
सद्यस्थितीत चाळी-झोपडपट्टय़ांमधील कंटेनमेंट झोनमध्ये 42 हजार घरांमधील 1 लाख 79 हजार रहिवासी प्रतिबंधात आहेत, तर इमारतींमधील 37 हजार घरांमधील 1 लाख 36 हजार रहिवासी प्रतिबंधात आहेत.
तर 2815 मजले सील असल्याने तब्बल 1 लाख 11 हजार घरांमधील 4 लाख 35 हजार रहिवासी प्रतिबंधात आहेत. तिन्ही प्रकारात एकूण 1 लाख 90 हजार घरांतील तब्बल 7 लाख 50 हजार मुंबईकर सध्या प्रतिबंधात आहेत.