बोर्डाच्या परीक्षेसाठी मुंबई महापालिका सज्ज; गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक माध्यमिक शाळेत परीक्षा केंद्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दहावीच्या परीक्षेसाठी मुंबई महापालिका शिक्षण विभाग सज्ज झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडक परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींची गर्दी होऊ नये यासाठी पालिकेच्या प्रत्येक माध्यमिक शाळेत परीक्षा केंद्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच परीक्षेच्या तोंडावर पालिकेच्या माध्यमिक शाळा कोरोना विलगीकरण कक्षासाठी देऊ नयेत, अशा सूचनाही शिक्षणाधिकारी कार्यालयाने जारी केल्या आहेत.

29 एप्रिल ते 31 मे या कालावधीत दहावीची परीक्षा होणार असून सद्यस्थितीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थी व पर्यवेक्षीय यंत्रणेच्या जीवितास धोका होऊ नये यासाठी महापालिकेने उपाययोजना केल्या आहेत. विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेतच त्यांचे परीक्षा केंद्र असणार असून यंदा सुट्टीच्या काळात परीक्षा होत असल्याने मनुष्यबळ कमी पडू नये यासाठी माध्यमिक शाळांमधील शिक्षकांव्यतिरिक्त प्रत्येक केंद्रावर प्राथमिक विभागातील पर्यवेक्षक म्हणून अतिरिक्त 10 शिक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच माध्यमिक शाळांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी कार्यरत नसल्याने प्रत्येक परीक्षा केंद्रावर प्राथमिक शाळांमधील चतुर्थ श्रेणीतील 2 कर्मचारी आणि इमारतीमधील कार्यरत हाऊसकिपिंगच्या कर्मचाऱयांना परीक्षा काळात उपस्थित राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहे.

  • परीक्षेसाठी केंद्रप्रमुखांनी बेंच आणि डेस्कची मागणी केल्यास नजीकच्या शाळेतून परीक्षा केंद्रावर उपलब्ध करण्यात येणार.
  • सर्व परीक्षा केंद्रांवर टय़ूबलाइट, पंखे, पिण्याचे स्वच्छ पाणी, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सॅनिटायझर, थर्मल गन यांसारख्या भौतिक सुविधा ठेवणार.