Mumbai crime news – कांदिवलीतून 56 लाखांचे चरस जप्त; चौघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ कक्षाच्या कांदिवली युनिटने कारवाई करून 56 लाखांचे चरस जप्त केले आहे. याप्रकरणी चौघांना अटक केली. शंकर पटेल, अविनाश बेडेकर, तुनीर मुळीक, विवेक चौबे अशी त्यांची नावे आहेत.

शनिवारी कांदिवली युनिटचे पोलीस अधिकारी हे गस्त करत होते. तेव्हा चारकोपच्या महावीर नगर येथे शंकर आणि अविनाथ हे दोघे संशयास्पदरीत्या फिरत होते. त्या दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटत होत्या. पोलिसांना पाहताच ते दोघे पळून जायचा प्रयत्न करत होते. त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली. शंकरकडून सहा लाख रुपये किमतीचे आणि अविनाशकडूनदेखील 1 लाख 60 हजार रुपयांचे चरस जप्त केले. पुढील चौकशीसाठी त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

अविनाशच्या चौकशीत तुनीरचे नाव समोर आले. पोलिसांनी तुनीरकडून 30 लाख रुपयांचे चरस जप्त केले. तुनीरने ते चरस विवेक कडून आणल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी विवेकला ताब्यात घेतले. त्याच्याकडूनदेखील 20 लाखांचे चरस जप्त केले. त्या चौघांविरोधात ‘एनडीपीएस’ कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. त्यांच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

12 लाख 60 हजारांचे एमडी जप्त 

एमडी ड्रगची तस्करी करणाऱ्या दोघांना क्राईम ब्रँच युनिट- 11 ने अटक केली. अक्षय जगताप, इक्बाल हुसेन अशी त्यांची नावे आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक अविनाश घोणे, सहाय्यक निरीक्षक जाधव याचे पथक गोरेगाव पूर्व परिसरात गस्त करत होते. गस्तीदरम्यान संतोष नगर येथे जगताप आणि हुसेन हे दोघे पोलिसांना पाहून पळत होते. पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन त्याच्याकडून 12 लाख 60 हजार रुपयांचे एमडी जप्त केले. ड्रग्जप्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. त्याचा तपास युनिट-11 करत आहेत.