लोन एजंटची फसवणूक करणारा अटकेत 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोन एजंटची चार लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाला जुहू पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. राजेंद्र रावणे असे त्याचे नाव आहे. त्याच्या इतर साथीदारांचा जुहू पोलीस शोध घेत आहेत.

तक्रारदार हे लोन एजंट असून विलेपार्ले येथे राहतात. दोन वर्षांपूर्वी त्यांची एका फरारी आरोपीशी ओळख झाली होती. त्या फरारी आरोपीने आपण दुधाचा आणि व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय करतो, असे सांगितले. त्यानंतर एजंट हा फरारी आरोपीच्या संपर्कात आला. फरारी आरोपी हा सांताक्रुझ येथे एजंटला भेटायला येत असायचा. ऑगस्ट महिन्यात फरारी आरोपीने एजंटला फोन केला. त्याने आणखी एका फरारी आरोपीशी ओळख करून दिली. 100 रुपयांच्या चार लाख 40 हजार रुपयाच्या नोटांच्या बदली 500 रुपयांच्या नोटा द्याव्या, असे सांगितले. त्यानंतर एजंट हे 2 लाख रुपये घेऊन सांताक्रुझ येथे आले. तेव्हा फरारी आरोपीने 2 लाख रुपयांबाबत विचारणा केली असता आपला मित्र पैसे घेऊन येत असल्याचे त्याने सांगितले.

मिटिंग सुरू झाल्यावर एजंटचा मित्र दोन लाख रुपये घेऊन सांताक्रुझ परिसरात आला. पैसे घेऊन एजंट हे फरारी आरोपीसोबत जुहू परिसरात गेले. एजंट आणि तीन फरारी आरोपी हे पायी जुहू परिसरात जात होते. तेथे एक जण उभा होता. एजंटने चार लाख रुपये एकाला दाखवले. तेवढय़ात एक पांढऱ्या रंगाची गाडी तेथे आली. त्या गाडीतून दोन जण उतरले. भीतीपोटी एजंट हे पैशाची बॅग टाकून तेथून पळून गेले.