
‘वेळेचे पक्के’ म्हणून जगभर नावाजलेल्या मुंबईच्या डबेवाल्यांचे ‘टायमिंग’ सध्या बिघडले आहे. शेकडो वर्षे वेळेवर डबा पोहोचवण्याच्या परंपरेला उपनगरी मार्गावरील वातानुकूलित (एसी) लोकलने धक्का दिला आहे. रेल्वे प्रशासनाने धीम्या मार्गावरही एसी लोकलची सेवा सुरू केली आहे. त्यामुळे सकाळच्या सुमारास डबेवाल्यांचे व्यवस्थापन बिघडून नोकरदारांच्या कामाच्या ठिकाणी डबा पोहोचण्यास उशीर होत आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने एसी लोकलचे वेळापत्रक बदलावे, असे साकडे डबेवाल्यांनी घातले आहे.
मुंबईच्या डबेवाल्यांच्या वक्तशीरपणाने अख्ख्या जगाला भुरळ घातली. ब्रिटनचे नवे सम्राट प्रिन्स चार्ल्स हे काही वर्षांपूर्वी हिंदुस्थान दौऱयावर आले होते. त्यावेळी त्यांनी डबेवाल्यांची भेट घेतली आणि डबेवाल्यांच्या व्यवस्थापनाचे, विशेषतः वक्तशीरपणाचे काwतुक केले होते. त्यांच्या दौऱयानंतर डबेवाल्यांचा जगभर नावलौकिक झाला. डबेवाल्यांनी तीच पूर्वापार ओळख जपत आपली सेवा अविरत सुरू ठेवली आहे. पण सध्या उपनगरी मार्गावरील धीम्या एसी लोकलने डबेवाल्यांचे ‘टायमिंग’ कोलमडले आहे. डबेवाल्यांना एसी लोकलमध्ये परवानगी नसल्याने मागून येणाऱया दुसऱया लोकलची वाट पाहावी लागते. त्यामुळे कार्यालयात डबा पोहोचण्यास जवळपास 20 ते 25 मिनिटांचा उशीर होत आहे.
पश्चिम रेल्वेवर बोरिवली, भाईंदरपर्यंत तर मध्य रेल्वेवर डोंबिवलीपर्यंत डबेवाल्यांना धावपळ करावी लागते. ऐन सकाळच्या सुमारास वेळेचे गणित चुकू न देण्याची कसरत डबेवाले करतात. त्यातच प्लॅटफॉर्मवर आयत्यावेळी एसी लोकल आली की वेळेचे गणित बिघडते. साधारण 10 मिनिटे वाया जातात, पण दुसऱया नियमित लोकलची प्रतीक्षा करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नसतो, असे मुंबईचे डबेवाले सांगतात.
मुंबईतील नोकरदारांना वर्षानुवर्षे डबे पोहोचवण्याची सेवा प्रामाणिकपणे देत आलोय. त्यामुळे डब्यांच्या ‘लेटमार्क’बाबत त्यांची कुठलीही तक्रार नसते, परंतु रेल्वे प्रशासनाने आमच्या सेवेचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. आम्ही उपनगरी लोकलचे शेकडो वर्षांपासून नियमित वारकरी आहोत, याचा प्रशासनाने विचार करावा आणि एसी लोकलचे वेळापत्रक बदलावे. सकाळी 10 ते 11 वाजण्याच्या दरम्यान धीम्या मार्गावर एसी लोकल चालवणे टाळावे.
– रघुनाथ मेदगे, माजी अध्यक्ष, मुंबईचा डबेवाला संघटना



























































