
फेरीवाला धोरणातून 1200 दिव्यांग स्टॉलधारकांना वगळण्यात यश मिळाल्यानंतर दिव्यांग व्यक्तींचा परवाना त्याच्या निधनानंतर कुटुंबीयांच्या नावे करावा, ही शिवसेनेची मागणी पालिका महासभेत मंजूर करण्यात आली. त्यामुळे मुंबईतील सुमारे 1200 स्टॉलधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई महापालिकेच्या परवाना विभाग खात्याकडून दिव्यांग व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी स्टॉलचा परवाना देण्यात येतो. या परवान्यावर हे दिव्यांग स्टॉलमध्ये झेरॉक्स तसेच इतर छोटे-छोटे उद्योग चालवतात. अशा दिव्यांग व्यक्तीचे निधन झाल्यास, त्यांच्या कुटुंबात अन्य दिव्यांग व्यक्ती नसल्यास त्या व्यक्तीला स्टॉल चालवण्यासाठी देण्यात येणारा परवाना पत्र पालिका ताब्यात घेते. त्यामुळे स्टॉलही परत करावा लागतो. दिव्यांग व्यक्ती हाच कुटुंबाचा मुख्य आधार असते. त्याच्या निधनानंतर कुटुंबात इतर कोणी कमावती व्यक्ती नसल्यास त्यांच्या कुटुंबासमोर पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होतो आणि आर्थिक स्थिती अधिक बिकट होते.
ही समस्या लक्षात घेऊन पालिकेच्या परवाना खात्याकडून दिव्यांग व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी देण्यात आलेले परवाना पत्र त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या कुटुंबात अन्य कोणी कमावती नसल्यास किंवा त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यास त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे कायमस्वरूपी हस्तांतरित करण्यात यावे यासाठी शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांनी पाठपुरावा केला होता. याबाबत पालिका मुख्यालयात आज झालेल्या महासभेत महापौर किशोरी पेडणेकर यांनी पडवळ यांच्या ठरावाच्या सूचनेला मंजुरी दिली. त्याचबरोबर यासाठी पुढील आवश्यक तो पाठपुरावा करणार असल्याचे महापौरांनी सांगितले. त्यामुळे पालिकेचे परवानाधारक असलेल्या 1200 स्टॉलधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.






























































