महानंद आर्थिक उधळपट्टी प्रकरण , माजी संचालकांची झोप उडाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

महानंद डेअरीतील आर्थिक उधळपट्टीची सहकार विभागाने स्वतंत्र अधिकाऱयामार्फत चौकशी सुरू केल्याने माजी संचालकांची झोप उडाली आहे. 2009 मध्ये तत्कालीन संचालक मंडळाने मनमानी करत भूम तालुका दूध संघाला दिलेल्या आगाऊ रकमेची थकबाकी 84 लाखापर्यंत पोहचली आहे. त्यामुळे महानंद डेअरीला झालेल्या आर्थिक नुकसानीला चौकशी अधिकाऱयाने संचालकांना जबाबदार धरल्याने त्यांची थकीत रकमेच्या वसुलीसाठी धावाधाव सुरू आहे.

महानंदला दुधाचा पुरवठा करणाऱया दूध संघांना डेअरीकडून आगाऊ पाच दिवसांची रक्कम देण्याचा नियम आहे. मात्र हा नियम धाब्यावर बसवत डेअरीच्या तत्कालीन संचालकांनी धाराशीव जिह्यातील भूम तालुका संघाला 65 लाख रुपयांची आगाऊ रक्कम दिली होते. ती आता 50 लाख रुपये मूळ रक्कम आणि 34 लाख रुपये व्याज, दंडाची रक्कम आहे. याची जबाबदारी निश्चित करण्यासाठी सहकार विभागाने नेमलेल्या प्राधिकृत अधिकाऱयाने तत्कालीन 58 संचालक आणि अधिकाऱयांना जबाबदार धरले आहे. यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांचाही समावेश आहे. त्यामुळे भविष्यात होणारी कारवाई टाळण्यासाठी भूम संघाने थकवलेली रक्कम वसूल करण्यासाठी अजित पवार यांच्या उपस्थितीत नुकतीच महानंदचे संचालक आणि भूम संघाची बैठक झाली. यामध्ये थकीत रक्कम तत्काळ भरण्याच्या सूचना अजित पवार यांनी भूम संघाला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. सदर रक्कम वसूल झाल्यास महांनद डेअरीला मोठा दिलासा मिळणार आहे.

भूम संघाकडे कोटय़वधी रुपयांची मालमत्ता

आर्थिक बेशिस्तीमुळे अडचणीत असलेल्या भूम तालुका दूध संघावर सध्या प्रशासक आहे. या संघाकडे कोटय़वधी रुपयांची मालमत्ता आहे. त्यामध्ये महानंद डेअरीकडे लाखो रुपयांचे शेअर्स असून 25 लाख रुपयांचे बँक डिपॉझिट आहे. तसेच संघाकडे सुमारे अडीच एकर जागा असून त्याची किंमत सुमारे 10 कोटी रुपये एवढी आहे. त्याची आम्ही पाहणी केली असून लवकरच महानंदची थकीत रक्कम मिळेल असा विश्वास डेअरीचे उपाध्यक्ष डी. के. पवार यांनी व्यक्त केला.