कोर्टाच्या आदेशाचा अवमान, चित्रपट निर्मात्याला सहा महिन्यांची कैद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

चित्रपट निर्मितीसाठी एका कंपनीकडून घेतलेले कोटय़वधी रुपये कंपनीला परत करण्याचे आदेश हायकोर्टाने देऊनही न्यायालयाचा आदेश झुगारणाऱया चित्रपट निर्माता गौरांग दोशी याला मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. कोर्टाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी न्यायमूर्ती शाहरुख काथावाला यांनी चित्रपट निर्माता दोशी याला सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

‘आँखे-2’, ‘दिवार’ या चित्रपटाची निर्मिती करणाऱया गौरांग दोशी याने चित्रपट निर्मितीसाठी आर्थिक पाठबळ मिळावे म्हणून स्कोर्ग इंटरनॅशनल कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत 26 डिसेंबर 2015 साली करार केला. ‘आँखे-2’ या चित्रपटाच्या निर्मितीसाठी कंपनीने दोशी याला 1 कोटी 25 लाख रुपये दिले. करारानुसार 26 मार्च 2016 रोजी ही रक्कम दोशी याने कंपनीला परत करणे बंधनकारक असतानाही त्याने रक्कम परत केली नसल्यामुळे कंपनीने दाद मागण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. 20 एप्रिल 2017 रोजी न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी दोशी यांना सर्व मालमत्तेची माहिती कोर्टात सादर करण्याचे आदेश दिले होते, मात्र दोशी यांनी त्याबाबत कोणतीही माहिती कोर्टाला दिली नाही. एवढेच नव्हे तर न्यायमूर्ती के. आर. श्रीराम यांनी पक्षकारांना कोर्टात हजर राहण्यासह 1 कोटी 25 लाख 11 हजार 111 रुपये कोर्ट रजिस्ट्रारकडे जमा करण्याचे आदेश दिले होते. मात्र या आदेशाचे कोणतेही पालन करण्यात न आल्याने न्यायमूर्ती शाहरुख काथावाला यांच्यासमोर पार पडलेल्या सुनावणीत न्यायालयाने दोशी याला सहा महिन्यांकरिता साधी तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.