बंगळुरूचे पहिले आयएसएल जेतेपद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

हीरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल अंतिम लढतीत रविवारी बंगळुरूच्या बचावपटू राहुल भेकेने हेडरने केलेल्या एकमेव गोलमुळे बंगळुरू एफसी संघाने एफसी गोवा संघाचे आव्हान 1-0 असे संपवीत पहिलेवहिले आयएसएल विजेतेपद पटकावले. मुंबई फुटबॉल एरीनावर सुमारे आठ हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या अंतिम सामन्यात बंगळुरूने एफसी आणि गोवा संघांत निर्धारित वेळेत 0-0 अशी गोलरहित बरोबरी होती. त्यामुळे 30 मिनिटांचा अतिरिक्त वेळ उभय संघांना देण्यात आला. अतिरिक्त वेळ संपण्यास चार मिनिटे बाकी असताना हिंदुस्थानी खेळाडू भेके याने 116 व्या मिनिटाला नोंदवलेला गोल अखेर बंगळुरूसाठी निर्णायक ठरला.

मुंबईच्या शहाजीराजे भोसले क्रीडा संकुल स्टेडियमवरील आयएसएल अंतिम लढतीत गोव्याला अतिरिक्त सत्रात दहा खेळाडूंनीशी खेळावे लागले. याचा फायदा बंगळुरूच्या कसलेल्या संघाने उठवला. सेट-पीसवरील कौशल्यही बंगळुरूने दाखवून दिले. गत मोसमात बंगळुरूला घरच्या मैदानावर अंतिम सामन्यात चेन्नईयीन एफसीकडून पराभूत व्हावे लागले होते. यावेळी मात्र बंगळुरूने आपली मोहीम फत्ते केली. साखळीत गोव्याविरुद्ध राखलेले वर्चस्व बंगळुरूने अबाधित राखले. डिमास डेल्गाडोने घेतलेल्या कॉर्नरवर भेकेने ताकदवान हेडिंग करीत गोव्याचा गोलरक्षक नवीन कुमार याला चकविले.

अतिरिक्त वेळेतील पहिल्या सत्रातील अखेरच्या मिनिटाला मध्य क्षेत्रातील रेषेपाशी मिकू आणि जाहौह यांच्यात चेंडूवर ताबा मिळविण्यासाठी चुरस झाली. त्यात मिकूने जाहौहला ढकलले, तर पडताना जाहौहने मिकूला लाथ मारली. त्यामुळे जाहौहला दुसऱया यलो कार्डसह मैदान सोडावे लागले. निर्धारित वेळेतील 47 व्या मिनिटाला हर्नांडेझला मागून धक्का देत पाडल्यामुळे जाहौहला पहिल्या यलो कार्डला सामोरे जावे लागले होते.

निर्धारित वेळेत गोलशून्य बरोबरी

त्याआधी 90 मिनिटांच्या निर्धारित वेळेत गोलशून्य बरोबरी होती. पहिलाच प्रयत्न बंगळुरूने दुसऱया मिनिटाला केला. निशू कुमारच्या थ्रो-इनवर मिकूने चेंडूवर नियंत्रण मिळविले आणि सुनील छेत्रीला पास दिला. छेत्रीने पहिल्या प्रयत्नात मारलेला फटका मात्र स्वैर होता. चार मिनिटांनी मिकूला बॉक्सलगत छेत्रीने पास दिला. मिकूने नेहमीच्या वेगाने मुसंडी मारली. त्यावेळी गोव्याच्या बचाव फळीला मिकूने पार केले हते, पण गोव्याचा गोलरक्षक नवीन कुमार पुढे सरसावला. त्याने झेप टाकत चेंडू ताब्यात घेत ही चाल फोल ठरवली.