
मुंबईतील सात पोलीस ठाण्यांचे विभाजन करून महाराष्ट्र नगर, गोळीबार, मढ मार्वे, असल्फा अशी चार नवीन पोलीस ठाणी मुंबईत निर्माण करण्यास गृह विभागाने मान्यता दिली आहे. तसेच दोन नवे पोलीस उपायुक्त आणि तीन सहायक पोलीस आयुक्त विभाग निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मुंबईत सध्या 96 पोलीस ठाणी आहेत. नव्या 4 पोलीस ठाण्यांमुळे पोलीस ठाण्यांची सेंच्युरी झाली आहे.
मुंबईत नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती होण्यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे.
मुंबईमध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या भांडुप व पार्कसाईट पोलीस ठाण्याचे विभाजन करून महाराष्ट्रा नगर हे नवे पोलीस ठाणे निर्माण करण्यात येणार आहे. वाकोला व निर्मल नगर पोलीस ठाण्यांचे विभाजन करून गोळीबार हे नवे पोलीस ठाणे निर्माण करण्यात येईल. मालवणी पोलीस ठाण्याचे विभाजन करून मढ मार्वे आणि घाटकोपर व साकीनाका पोलीस ठाण्यांचे विभाजन करून असल्फा पोलीस ठाण्याची नव्याने निर्मिती करण्यात येणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय गृह विभागाकडून आज जारी करण्यात आला.
परिमंडळ 13 ची पुनर्रचना
मुंबईत सध्याच्या पोलीस आयुक्तालयांतर्गत असणाऱ्या परिमंडळ 13 ची पुनर्रचना करून दोन नवीन परिमंडळांची निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच तीन नवीन सहायक पोलीस आयुक्त विभाग निर्माण करण्यात येणार आहेत. नव्याने निर्माण करण्यात येणाऱया परिमंडळासाठी एकूण 34 तर सहायक पोलीस विभागासाठी एकूण 30 पदांची निर्मिती करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
नवीन पोलीस ठाण्यांसाठी 1448 पदे मंजूर
मुंबईत नव्याने निर्माण करण्यात येणाऱया महाराष्ट्र नगर, गोळीबार, मढ मार्वे, असल्फा या चारही पोलीस ठाण्यांसाठी प्रत्येकी 362 अशी एकूण 1448 पदे निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पदनिर्मिती आणि पोलीस ठाण्यांच्या निर्मितीसाठी 124 कोटी 13 लाख आवर्ती आणि 7 कोटी 39 लाख अनावर्ती खर्चास गृह विभागाने मान्यता दिली आहे.































































