वार्ता विघ्नाची… परतीच्या प्रवासात चाकरमान्यांची घुसमट, मुंबई – गोवा हायवेवर जीवघेणी कोंडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गौरी-गणपतीसाठी कोकणात जाताना बेहाल झालेल्या लाखो चाकरमान्यांचे परतीच्या प्रवासातही प्रचंड हाल होत आहेत. पाच दिवसांच्या बाप्पांना निरोप दिल्यानंतर चाकरमानी मोठय़ा संख्येने मुंबईला परतू लागले आहेत. मात्र मुंबई-गोवा महामार्गाची वाताहत झाली असल्याने तसेच कोकण रेल्वे मार्गावर सर्वच गाडय़ा तीन ते चार तास उशिराने धावत असल्याने चाकरमान्यांपुढे अनेक विघ्ने ठाकली आहेत. रायगडमध्ये वीर ते माणगाव दरम्यान वाहनांची 22 किलोमीटर रांग लागली आहे. हे अंतर कापायला 20 मिनिटांऐवजी किमान चार तास लागत आहेत. वाकण-पाली-खोपोली या पर्यायी मार्गावरही तुफान काsंडी झाली आहे. खेडचा कशेडी घाट आणि संगमेश्वरमध्येही हीच स्थिती आहे. त्याचवेळी कोकणातील सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली आहे. खेड स्थानकात प्रवाशांच्या संतापाचा स्फोट झाला. रूळांवर उतरत प्रवाशांनी मंगला एक्प्रेस रोखून धरली.

खड्डय़ात गेलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरून दणकेबाज प्रवास करण्याऐवजी दरवर्षी चाकरमानी पुणे-बंगळुरू महामार्गावरून प्रवास करत कोकण गाठतात. मात्र या वर्षी सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी रेटून खोटे बोलत पळस्पे ते इंदापूर मार्गावरील काँक्रीटची एक लेन पूर्ण होईल. त्यामुळे प्रवासात कोणतेही विघ्न येणार नाही, असे राणाभीमदेवी थाटात सांगितले होते. प्रत्यक्षात सरकारची घोषणा गाजराची पुंगीच ठरल्याने संतप्त झालेल्या चाकरमान्यांनी भूलथापांना बळी न पडता पुढच्या वर्षी सातारा-कोल्हापूरमार्गे गाव गाठण्याचा निश्चय केला आहे.

शास्त्री पूल-ओझरखोलदरम्यान वाहतूककोंडी

महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातही वाहनांची लांबच लांब रांग लागली आहे. शास्त्राr पूल ते ओझरखोलदरम्यान प्रचंड कोंडी झाली आहे.

खोके सरकारविरुद्ध संताप

12 वर्षांपासून रडतखडत सुरू असलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरून गणपतीसाठी यंदा तरी सुखकर प्रवास करता येईल, या आशेने बॅगा भरून कोकणची वाट धरलेल्या चाकरमान्यांचा वाटेतच ‘मोरया’ झाला. सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी तीन महिन्यांत पळस्पे ते पोलादपूरदरम्यान पाच दौरे करून काँक्रीटची एक लेन 10 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा वायदा केला होता, मात्र आमटेम, नागोठणे, वाकण तसेच अन्य भागात सिमेंटची भुकटी टाकून प्रवाशांना उल्लू बनवण्याचे काम करण्यात आल्याने अनेक ठिकाणी काही दिवसांतच हा रस्ता फुटला. त्यामुळे ट्रफिकमध्ये अडकल्याने चाकरमान्यांना घर गाठायला 16 तासांहून अधिक वेळ लागला. एका लेनची थातुरमातुर डागडुजी करणाऱया सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंबई दिशेच्या मार्गाकडे सपशेल दुर्लक्ष केल्याने खड्डय़ांमुळे प्रचंड वाहतूककाsंडी झाली. त्यामुळे खोके सरकारविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे. ‘फडतूस’ कारभारावरून शिव्यांची लाखोली वाहत प्रवाशांकडून सरकारची ‘उत्तर पूजा’च सुरू आहे.

अबालवृद्धांचे हाल
वीर ते माणगावदरम्यान सकाळपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तीच अवस्था कोलाडजवळील भिसेखिंड, वाकण तसेच पाली-खोपोली मार्गावरही आहे. या काsंडीत अडकलेल्या महिला, मुले, वृद्ध यांचे प्रचंड हाल झाले. गाडीत एकाच जागी तासन्तास अडकून पडल्याने अनेकांना चक्कर, मळमळ, पाठदुखी, मणकेदुखी याचा त्रास झाला.

एसटी 2 तास उशिराने
एसटीचीही रखडपट्टी झाली आहे. आज एकूण 143 गाडय़ांचे बुकिंग करण्यात आले होते. मात्र महामार्गावर झालेली प्रचंड वाहतूककोंडी, कशेडी घाटात वाहनांच्या लागलेल्या रांगा यामुळे गाडय़ा सुमारे दोन तास उशिराने धावत होत्या.

प्रवासी गुदमरला
खेड स्थानकात अनेक प्रवाशांनी जागा मिळेल तेथून रेल्वेच्या डब्यात चढण्याचा प्रयत्न केला. या गर्दीतून आतमध्ये शिरताना एक युवक अक्षरशः गुदमरल्याने त्याच्यावर रेल्वे स्थानकातील प्रथमोपचार केंद्रात उपचार करण्यात आले. या प्रवाशाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

गाडी पकडण्यासाठी खेचाखेची
सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱया सर्व रेल्वेगाडय़ा प्रवाशांनी खचाखच भरून जात आहेत. खेड स्थानकात प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांना रेल्वेत शिरता आले नाही. त्यामुळे खटके उडाले. प्रवाशांमध्ये धक्काबुक्की होऊन तणाव निर्माण झाला. काही प्रवाशांनी रुळांवर उतरून मंगला एक्स्प्रेस काही वेळ रोखून धरली. पोलिसांनी या प्रवाशांना रुळांवरून हटवले. चिपळूण स्थानकातही जादा गाडीचे दरवाजे उघडले न गेल्याने प्रवाशांचा संताप झाला. आरक्षण असूनही अनेक प्रवाशांना गाडीत चढता आले नाही.