
सामना प्रतिनिधी । मुंबई
मराठी शाळेत शिकून जगाच्या पाठीवर प्रत्येक क्षेत्रात नाव होऊ शकते. अगदी जागतिक कीर्तीचे अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्यापासून विज्ञान, संशोधन क्रीडा, कला अशा क्षेत्रांतील अनेक दिग्गजांचे शिक्षण मराठी भाषेत झाले आहे. मराठी भाषेत शिक्षण घेऊन नाव कमावलेल्या एखाद्या व्यक्तीचे उदाहरण दिले तर मुले-पालक त्याला फॉलो करतील. त्याच्या नावाचे ब्रँडिंगही करता येईल. म्हणूनच मुलांना मराठी शाळांकडे वळवण्यासाठी पुढच्या काळात ब्रॅण्ड ऍम्बेसेडर नेमण्याची राज्य सरकारची योजना असल्याचे शालेय शिक्षणमंत्री ऍड. आशीष शेलार यांनी सांगितले.
मराठी शाळांची सध्याची परिस्थिती, बंद होणारे वर्ग, इंग्रजीचे वाढते प्रस्थ, मराठी भाषा सक्तीची करण्याची राज्य सरकारची योजना या विषयांवर शालेय शिक्षणमंत्री आशीष शेलार यांनी त्यांची मते व्यक्त केली. ते म्हणाले की, मराठी शाळा हा सरकारचा आग्रहाचा विषय आहे. मराठी शाळांचे संरक्षण झाले पाहिजे आणि नव्याने शाळा सुरू झाल्या पाहिजेत या भूमिकेवर राज्य सरकार आपला आराखडा तयार करीत आहे. मात्र त्याच वेळेस आपल्यासमोर मानसिक व व्यावहारिक अशी दोन आव्हाने आहेत. त्यावर मात करण्यासाठी राज्य सरकारच्या योजना आहेत.
मराठी भाषा सक्तीची
मराठी भाषा सक्तीची करण्याचा मानस खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत व्यक्त केला आहे. मराठी भाषेवर काम करणारी आपली समिती आहे. त्यात लेखक, विचारवंतांचा समावेश आहे. त्यांच्याशी आमचा संवाद सुरू आहे. त्यामध्ये एक मसुदा तयार झाला आहे. त्याआधी त्याची समिती होणे आवश्यक आहे. कारण समिती व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागेल अन्यथा कायदा केल्यावर कोणी तरी कोर्टात स्थगिती मिळवण्यासाठी जाईल. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर कायदेशीर प्रक्रिया परिपूर्णतेने करावी लागेल. त्यासाठी आम्ही समिती घोषित करणार आहोत. या समितीमध्ये खास करून सीबीएससी, आससीएससी शाळांचे प्रतिनिधीही घेण्याचा मानस आहे. कारण कोणालाच विचारात न घेता मराठी विषय सक्तीचा केला असे नक्राश्रू ढाळण्याचे कामच होणार नाही. मराठी भाषेच्या सक्तीबाबत आंदोलकांनी व विचारवंतांनी जो मसुदा दिला आहे त्या आधारावर येणाऱया विधानसभा निवडणुकीच्या आत या विषयावर ठोस निर्णय घेण्याचा मानस मुख्यमंत्र्यानी घोषित केला आहे, असे शेलार म्हणाले.
न्यूनगंड कमी करणार
अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्यापासून शारदाश्रम, बालमोहन शाळेत शिकलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रांतील दिग्गजांचा एक लघुपट मराठी शाळांमध्ये दाखवण्याचा राज्य सरकारचा विचार सुरू आहे. त्यातून त्या व्यक्तीचे प्रेरणादायी जीवन पुढे जाईल. मराठी शाळेच्या शिक्षणातून सुरुवात झाली हा संदेश समाजापुढे जाईल. अशा लघुपटातून यश संपादन करण्यासाठी प्रेरणा मिळेल. त्यातून पालक व विद्यार्थ्यांमधील मराठी शाळांबाबतचा न्यूनगंड दूर होईल अशी अपेक्षा आशीष शेलार यांनी व्यक्त केली.
मराठी शाळांचा ब्रँड ऍम्बेसेडर
येत्या काळात मराठी शाळांचे आकर्षण वाढवण्यासाठी ब्रँडिंग करायचे असेल तर राज्य सरकार आपल्या खर्चातून येणाऱया पुढच्या काळात एक ब्रँड ऍम्बेसेडर नियुक्त करील. त्यातून मराठी शाळांकडे वळण्याचे आवाहन जनतेला केले जाईल असे ते म्हणाले.
मराठी शाळांमध्ये अधिकचे शिक्षण
मराठी भाषेत शिकूनही त्याचे नाव जगाच्या पाठीवर त्याच्या क्षेत्रात होऊ शकते अशी असंख्य उदाहरणे आहेत. त्याचे योग्य पद्धतीने प्रस्तुतीकरण (प्रेझेंटेशन) केल्यास मानसिकतेत बदल करता येईल. दुसरे म्हणजे व्यावसायिक आव्हानांमध्ये मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांना इंग्रजीचे ज्ञान व व्यावसायिक गुणवत्तेमध्ये पुढे जाण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या मुलांना देण्यात येणारा आत्मविश्वास देणारे शिक्षण, किंबहुना त्यापेक्षा अधिकचे शिक्षण द्यायला लागेल. त्याने व्यावहारिकतेमध्ये व गुणवत्तेमध्ये मराठी विद्यार्थी पुढे जाऊन शकतील. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होईल. त्यासाठी या विद्यार्थ्यांना अधिकचे काय देता येईल यासाठी संबंधित तज्ञांसोबत विचार करण्याचा सरकारचा मानस आहे असे शेलार म्हणाले.



























































