
उन्हाळय़ात भटक्या कुत्र्यांसाठी सोसायटीच्या आवारात दररोज पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा, असा सल्ला उच्च न्यायालयाने मंगळवारी कांदिवलीतील सोसायटीच्या रहिवाशांना दिला. प्राण्यांना दररोज पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देणे हे सोसायटी रहिवाशांचे कर्तव्यच आहे, असेही न्यायालयाने नमूद केले. भटक्या कुत्र्यांना सोसायटीच्या आवारात खाद्यपदार्थ देण्याच्या मुद्दय़ावरून सुरू असलेला वाद न्यायालयात पोहचला आहे. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने भूतदया दाखवली. कांदिवली पश्चिमेकडील आरएनए रॉयल पार्क को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीतील रहिवासी परमिता पुथराण यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आर. एन. लड्ढा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.
कुत्र्यांवर काठी उगारणाऱया सुरक्षारक्षकांवर कारवाई करा!
सोसायटीच्या परिसरातील कुत्र्यांवर काठी उगारणाऱया तसेच कुत्र्यांना मारहाण करून दुखापत करणाऱया सुरक्षारक्षकांवर योग्य ती कारवाई करा, असे निर्देश न्यायालयाने या प्रकरणातील सोसायटीला दिले.
























































