हॉटेलचा मेन्यूही महागणार

547

अवकाळी पावसामुळे घटलेली भाज्यांची आवक, शंभरीच्या आसपास पोहोचलेला कांदा, वाढता ट्रान्सपोर्टचा खर्च याचा फटका आता सर्वसामान्यांसोबत हॉटेल व्यावसायिकांना देखील बसला आहे. सततच्या भाववाढीमुळे हॉटेल व्यावसायिकांचे देखील आर्थिक बजेट कोलमडले आहे. त्यामुळे मेन्यूला 5 टक्के महागाईची फोडणी देण्याचा निर्णय हॉटेलवाल्यांनी घेतली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून भाज्यांचे दर सातत्याने वाढत असले तरी हॉटेल व्यावसायिकांनी अद्याप खाद्यपदार्थांच्या किमतीत कोणतीही वाढ केली नाही. दरवाढीमुळे आमचेही बजेट कोलमडले आहे. कांद्यासह इतर भाज्यांचे दर कमी होतील या आशेवर आम्हीही आहोत. पण तसे न झाल्यास नाइलाजास्तव ठराविक खाद्यपदार्थांच्या किमतीत 5 टक्के भाववाढ आम्हाला करावी लागेल. पुढील आठवडय़ात होणाऱया बैठकीत यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे हॉटेल्स ऍण्ड रेस्टॉरंट (आहार) संघटनेचे अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी सांगितली.

राज्यात सर्वच ठिकाणी यंदा अतिवृष्टीने आणि त्यापाठोपाठ परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. अनेक शेतकऱयांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. परिणामी भाज्यांची आवक घटली आहे.

40 ते 60 रूपये किलो असणाऱया भाज्यांचे दर आता 80 ते 100 च्या आसपास पोहोचले आहेत. कांदा-टोमॅटोही शंभरीच्या आसपास पोहोचला आहे.

सर्वसामान्यांच्या घरातून आणि लहान हॉटेलांमधून कांदा जवळपास हद्दपार झाला आहे. फक्त फोडणीपुरताच कांदा, टोमॅटो वापरला जात आहे. लहान हॉटेलांनी यातून मार्ग काढण्यासाठी काही खाद्यपदार्थच मेन्यूकार्डमधून गायब केले आहेत.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या