
भावी पतीला दिल्ली विमानतळावरून सीमाशुल्काच्या तावडीतून सोडवण्याच्या नावाखाली महिलेला 2 लाख 98 हजारांना चुना लावल्याची घटना समोर आली आहे. फसवणूकप्रकरणी साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
तक्रारदार या अंधेरी परिसरात राहतात. त्यांनी लग्न जुळणाऱया एका संकेतस्थळावर नाव नोंदवले होते. गेल्या महिन्यात त्यांना नीरज नावाच्या व्यक्तीचा मोबाईलवर एक फोन आला. त्याने आपण एनआरआय असून सध्या वॉशिंग्टन येथे राहत असल्याचे सांगितले. त्यानंतर ते दोघे मोबाईलवर एकमेकांच्या संपर्कात होते. मार्चच्या पहिल्या आठवडय़ात आपण मुंबईत येणार असून लग्नाची अंतिम बोलणी करू असे महिलेला सांगितले. तिला विश्वास बसावा म्हणून व्हॉटस्ऍपवर विमानाचे तिकीट पाठवले.
गेल्या आठवडय़ात तक्रारदारांना फोन आला. आपण दिल्ली कस्टम विभागातून बोलत आहोत. नीरज नावाच्या व्यक्तीकडे अमेरिकन डॉलर आणि काही महागडे गिफ्ट सापडले आहे. जर नीरजला सोडवायचे असल्यास 58 हजार रुपये दंड भरावा लागेल असे तक्रारदारांना सांगितले. दंड आणि प्रमाणपत्राच्या नावाखाली महिलेला 2 लाख 98 हजार रुपये भरण्यास भाग पाडले. त्यानंतर महिलेला पुन्हा फोन आला. जर सहा लाख रुपये न भरल्यास नीरजला पुन्हा वॉशिंग्टनला पाठवणार नाही अशी भीती घातली. महिलेला हा प्रकार संशयास्पद वाटला. तिने आणि तिच्या मित्राने दिल्ली विमानतळावर चौकशी केली. चौकशी केल्यावर फसवणुकीचा प्रकार समोर आला. फसवणूकप्रकरणी महिलेने साकीनाका पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात ‘आयटी’ कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.































































