मुंबईला दुसऱ्या विजयाची आस, हैदराबादला टाळायचीय पराभवाची हॅटट्रिक

सलामीच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर गतविजेत्या मुंबई इंडियन्सने दुसऱया लढतीत कोलकाता नाइट रायडर्सला दहा धावांनी धूळ चारली आणि आयपीएलच्या यंदाच्या मोसमात झोकात पुनरागमन केले. आता उद्या सलग दुसऱया विजयाला गवसणी घालण्यासाठी रोहित शर्माची सेना सज्ज असेल. डेव्हिड वॉर्नरच्या सनरायझर्स हैदराबादला मात्र कोलकाता नाइट रायडर्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे उद्या होणाऱया मुंबई इंडियन्सविरुद्धच्या लढतीत पराभवाच्या हॅटट्रिकपासून दूर राहण्यासाठी हा संघ जिवाचे रान करताना दिसेल.

भुवी, नटराजनला फॉर्ममध्ये यावे लागेल

सनरायझर्स हैदराबादमध्ये भुवनेश्वरकुमार व टी. नटराजन हे दोन अव्वल दर्जाचे वेगवान गोलंदाज आहेत, पण आतापर्यंत दोघांनाही सूर गवसलेला नाहीए. यावेळी सनरायझर्स हैदराबादला फक्त फिरकीपटू राशीद खानच्या गोलंदाजीवर अवलंबून राहता येणार नाही. इतर गोलंदाजांनाही पुढाकार घ्यावा लागणार आहे. अन्यथा सनरायझर्स हैदराबादला आणखी एका पराभवाला सामोरे जावे लागू शकते.

फिरकी गोलंदाजाचा समावेश होण्याची शक्यता

चेन्नईतील खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांचा बोलबाला प्रकर्षाने दिसून येत आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ उद्याच्या लढतीत एका फिरकी गोलंदाजाचा संघात समावेश करू शकतो. राहुल चहर व कृणाल पांडय़ा हे दोन फिरकी गोलंदाज मुंबई इंडियन्समध्ये आहेत, पण कृणाल पांडय़ा हा फिरकी गोलंदाजापेक्षा अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. याचमुळे पीयूष चावला, अनुकूल रॉय व जयंत यादव या बेंचवर बसलेल्या फिरकीपटूंपैकी एकाला मुंबई इंडियन्समध्ये संधी मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको. ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह या वेगवान गोलंदाजांवर पुन्हा एकदा या संघाची मदार असणार आहे.

सूर्यकुमार यादवकडून अपेक्षा

चेन्नईतील खेळपट्टीवर फलंदाजांना धावा काढताना दमछाक उडते आहे. पण याच खेळपट्टीवर सूर्यकुमार यादव अगदी सहजपणे धावा वसूल करीत आहे. सूर्यकुमार यादवकडून उद्याच्या लढतीतच नव्हे तर संपूर्ण स्पर्धेदरम्यान मोठय़ा अपेक्षा बाळगल्या जात आहेत. रोहित शर्मा, क्विंटॉन डी कॉक, इशान किशन, कायरॉन पोलार्ड, हार्दिक पांडय़ा, कृणाल पांडय़ा यांच्या खांद्यावर मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीची जबाबदारी असणार आहे.

साहाला डच्चू मिळण्याची शक्यता

सलामीवीर रिद्धीमान साहाला या स्पर्धेत आपला ठसा उमटवता आलेला नाही. त्यामुळे उद्याच्या लढतीत त्याला संघामधून डच्चू देण्यात येऊ शकतो. कारण जॉनी बेअरस्टो फलंदाजीसोबत यष्टिरक्षणही करू शकतो. तसेच केदार जाधव व अभिषेक शर्मा हे खेळाडू अजूनही बेंचवर बसलेले आहेत. दोघेही अष्टपैलू खेळाडू आहेत. तसेच प्रियम गर्ग या फलंदाजाचाही संघात समावेश केला जाऊ शकतो.

आजची आयपीएल लढत
मुंबई इंडियन्स-सनरायझर्स हैदराबाद
चेन्नई, रात्री 7.30 वाजता

आपली प्रतिक्रिया द्या