
सामना ऑनलाईन। मुंबई
नोबेल शांति पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांना वोक्हार्ट समूहातर्फे जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. वोक्हार्ट समूहातर्फे रविवारी (National Museum of Indian Cinema) राष्ट्रीय सिनेमा संग्रहालयात सत्यार्थी दांपत्याच्या सन्मानार्थ एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्यार्थी यांचा माहितीपट ‘द प्राइस ऑफ फ्री’चेही स्क्रीनिंग झाले. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती उपस्थित होत्या.
देशाबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावर बालकांच्या विविध समस्यांवर काम करणाऱ्या सत्यार्थी यांना 2014 साली नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. दरम्यान, पुरस्कार सोहळ्यानंतर आपल्या छोटेखानी भाषणात सत्यार्थी यांनी आपल्या माहितीपटावर भाष्य केले. अनेक संकटांचा सामना करत आम्ही येथपर्यंत पोहोचलो असून बालकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे ते म्हणाले. तसेच आम्ही कधी मागे हटलो नाही आणि हटणारही नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी वोक्हार्ट समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक डॉ. हबिल खोराकीवाला यांनी बालकांच्या हक्कासाठी लढणाऱ्या सत्यार्थी यांना वोक्हार्ट जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. याप्रसंगी खोराकीवाला यांचे पुत्र डॉ. हुजैफा खोराकीवाला यांनी सत्यार्थी यांच्या कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच सत्यार्थी यांना पुरस्कृत करताना आपल्याला अभिमान वाटत असल्याचे सांगत त्यांनी सत्यार्थी यांना भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.
दरम्यान, सत्यार्थी यांच्या ‘द प्राइस ऑफ फ्री’ हा माहितीपट ऑस्कर विजेता चित्रपट निर्माता डेविस गुगेनहेम याच्या जीवनावर व कार्यावर आधारित आहे. गेल्या वर्षी सॉल्ट लेक सिटीमध्ये संपन्न झालेल्या चित्रपट गौरव सोहळ्यात या माहितापटास ग्रँड ज्युरी पुरस्कार मिळाला होता. तसेच You tubeवरही यावर्षी मोंटे कार्लो चित्रपट महोत्सवचा ‘पीसजम अवॉर्ड’ मिळाला होता.






























































