
लालबाग बी. ए. रोड भारतमाता ते साईबाबा रोडपर्यंत आणि हॉटेल रिजोईसपर्यंतच्या रस्ता दुभाजकाच्या सुशोभिकरणाचे काम शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पाठपुराव्याने होत असून या कामाचा शुभारंभही नुकताच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. मात्र हे काम आपल्याच प्रयत्नाने झाल्याचे सांगत श्रेय लाटण्यासाठी ‘मिंधे’ गटाकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसैनिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय निधीमधून हे काम होण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार अजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांनी प्रयत्न केले. यामुळे रस्त्याच्या दुभाजकाच्या सुशोभिकरणाचे काम मार्गी लागले असताना या कामाचे श्रेय लाटण्यासाठी ‘मिंधे’ गटाकडून पोस्टर लावले जात आहे. आमदार चौधरी यांच्या हस्ते झालेल्या कामाच्या शुभारंभावेळी किरण तावडे, कांचन घाणेकर, समीक्षा परळकर, सीमा संसारे, दिव्या बडवे, बबन सकपाळ, मंगेश चव्हाण, श्रुती पोटले, सुजय गुरव, एकनाथ सणस, सचिन यादव, बाळ नाईक, बाळा हळदणकर, अशोक लोके आदी उपस्थित होते.


























































