लोकल पूर्वीसारखीच ट्रॅकवर! आजच्या मंत्रालयातील बैठकीकडे चाकरमान्यांचे लक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य आणि पश्चिम रेल्वेची लोकल सेवा आजपासून खऱ्या अर्थाने ट्रकवर आली. कारण आठ महिन्यांपूर्वी या दोन्ही मार्गांवर 3150 फेऱया चालवल्या जायच्या. उद्यापासून 2773 फेऱया धावतील. त्यामुळे लोकलला आता प्रतीक्षा आहे ती ‘सर्वांची.’ राज्य सरकारने सर्वांसाठी लोकल सुरू करा, असे सांगितले असले तरी रेल्वेने मात्र कोविड आणि गर्दी असे समीकरण मांडत काही ‘तांत्रिक’ अटी घातल्या आहेत. उद्या सोमवारी मंत्रालयात याच मुद्दय़ावर पुन्हा एकदा बैठक होणार असून त्यात काय निर्णय होतो याकडे चाकरमान्यांचे लक्ष लागले आहे.

लॉकडाऊनपूर्वी मध्य रेल्वे 1774 तर पश्चिम रेल्वे 1376 फेऱया अशा एकूण 3150 फेऱया चालवायची. अनलॉकमध्ये सुरुवातीला अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, नंतर खासगी सेवा, महिलांसाठी अशा फेऱया सुरू झाल्या आणि लोकल ट्रकवर येण्यास सुरुवात झाली. शनिवारी दोन्ही मार्गांवर 600 फेऱया वाढवण्यात आल्या. तर आज पुन्हा त्यात 753 फेऱयांची भर घालण्यात आली. त्यामुळे सोमवारपासून दोन्ही मार्गांवर 2773 इतक्या फेऱया धावणार आहेत. थोडक्यात काय, तर लोकलचे वेळापत्रक बहुतांशी रुळावर आले आहे.

रेल्वेचा हट्ट कायम

रेल्वेने लोकल फेऱया वाढवल्या असल्या तरी सर्वांना प्रवेश देण्यास मात्र नकार दिला आहे. गर्दीचे विभाजन करण्यासाठी राज्य सरकारने वेळेनुरूप पाच उताय सुचवले, पण ते रेल्वेला मान्य नाहीत. कोलकात्याप्रमाणे मोबाईल अॅप आणूया, मग गर्दीचे विभाजन सुकर होईल हा रेल्वेचा हट्ट कायम आहे. सोमवारी मंत्रालयात होणाऱया बैठकीत याच मुद्दय़ावर प्रामुख्याने चर्चा होईल, असे सांगण्यात आले.

मार्ग निघाला तर दोन्ही मार्गांवरील उरल्यासुरल्या 300 फेऱयाही वाढवण्यात येतील आणि सर्वांसाठी प्रवेश देऊन मुंबईची लाईफलाईन धावू लागेल, असे अधिकाऱयांनी सांगितले.

आजपासून काय?

  • मध्य रेल्वेवर सध्या 1020 फेऱया रोज चालवण्यात येत होत्या. त्यात 552 नव्या फेऱयांची भर टाकून आता मध्य रेल्वे रोज 1572 फेऱया चालवणार आहे. पश्चिम रेल्वेवर सध्या 1000 फेऱया चालवण्यात येत होत्या. त्यात 201 नव्या फेऱ्यांची भर टाकून पश्चिम रेल्वे रोज 1201 फेऱया चालवणार आहे.
  • मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर खोपोलीसह 836 फेऱया, हार्बर मार्गावर गोरगावसह 490 आणि ट्रान्सहार्बर मार्गावर 246 अशा मध्य रेल्वेच्या दररोज 1572 फेऱया आता सोमवारपासून धावणार आहेत.