चोरट्यांनी घेतला कोरोनाचा धसका; 15 दिवसांत चोरीचे गुन्हे घटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गर्दीचा फायदा घेत लोकलमध्ये चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांनी देखील कोरोनाचा धसका घेतला आहे. गेल्या 15 दिवसात रेल्वेत चोरीचे प्रमाण 20 टक्क्यांनी घटल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईकराची लाइफ लाइन असलेल्या लोकलने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. तिन्ही मार्गांवर गर्दीचा फायदा घेत चोरटे हे मोबाईल चोरी, पाकीटमारी करतात. दिवसाला 60 हून अधिक मोबाईल चोरीचे गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल होतात. पण महाराष्ट्रासह मुंबईत कोरोनाचे रुग्ण आढळू लागल्याने लोकलमध्ये प्रवाशाची गर्दी कमी होत आहे. चोरटय़ांनी देखील कोरोनाचा धसका घेतला आहे. 1 ते 15 फेब्रुवारी या काळात तिन्ही मार्गांवर चोरीचे 1 हजार 478 गुन्हे दाखल आहेत. तर 1 ते 15 मार्च या काळात 1 हजार 236 गुन्हे दाखल आहेत. पाकीटमारी, चोरी सोनसाखळी चोरी आणि इतर चोरीचे असे मिळून 242 गुन्हे कमी झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

  • फलाटावर गस्तीवर असणाऱया रेल्वे पोलिसांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध करून दिले आहेत. 17 रेल्वे पोलीस ठाणी, आयुक्त, उपायुक्त कार्यालयांतील कर्मचाऱयांना मास्क घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.