
सामना ऑनलाईन, मुंबई
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात अलीकडेच दाखल झालेल्या बम्बार्डिअर लोकलचा वेग आता चर्चगेट ते बोरिवलीदरम्यान धीम्या मार्गावर दर ताशी ७० कि.मी.वरून ९० कि.मी. करण्यात येणार आहे. यामुळे पश्चिम रेल्वेचा वक्तशीरपणा राखण्यात मदत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पश्चिम रेल्वेला मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प-२ अंतर्गत ६३ बम्बार्डिअर कंपनीच्या लोकल मिळाल्या आहेत. चर्चगेट ते बोरिवली धीम्या मार्गावर लोकलच्या वेगावर रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी घातलेल्या निर्बंधामुळे लोकलचा वेग काही भागात कमी ठेवण्यात येत असतो. परंतु रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी सुचविलेल्या सिग्नलसह अन्य तांत्रिक बाबींचे आधुनिकीकरण पश्चिम रेल्वेच्या इंजिनीअरिंग विभागाने केले असल्याने बम्बार्डिअर लोकलचा वेग वाढविणे शक्य होणार आहे. त्यामुळे चर्चगेट ते बोरिवली धीम्या मार्गावरील बम्बार्डिअर लोकल आता ताशी ९० कि.मी.च्या वेगाने धावणार आहेत.
सिग्नलसह काही तांत्रिक बाबींची पूतर्ता पूर्ण झाली असल्याने आम्ही रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे अहवाल पाठविणार असून त्यांच्या सुरक्षा प्रमाणपत्रानंतर चर्चगेट ते बोरिवली बम्बार्डिअर लोकलचा वेग वाढविणे शक्य होणार आहे. त्यामुळे लोकल वेळेवर चालविणे शक्य होणार असून काही नव्या फेऱया चालविणे शक्य होणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक संजय मिश्रा यांनी सांगितले.


























































