
अतिक्रमण, बेकायदा पार्किंग आणि कचऱयाच्या ढिगांनी वेढलेल्या माहीम बीचला लवकरच गतवैभव मिळणार आहे. यामध्ये पालिका किनाऱयाची स्वच्छता करणार असून संपूर्ण परिसर अतिक्रमण, बेकायदा पार्किंगमुक्त करून सौंदर्यीकरण करणार आहे. शिवाय किनाऱयाची धूप रोखण्यासाठी बांधकामाची डागडुजीही करण्यात येणार आहे.
मुंबईतील महत्त्वाच्या चौपाटय़ांमध्ये माहीम चौपाटीचा समावेश होतो. त्यामुळेच दररोज शेकडोच्या संख्येने मुंबईकर-पर्यटक या ठिकाणी येत असतात. मात्र सद्यस्थितीत माहीम रेतीबंदरचा परिसर बेकायदा पार्किंगने व्यापला आहे. किनाऱयाच्या उत्तरेकडील बाजूला अतिक्रमण करून झोपडय़ा उभारण्यात आल्यामुळे या भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तर दक्षिणेकडील माहीम पोलीस वसाहतीची भिंत मोडकळीस आली असून समुद्रकिनाऱयावर कचऱयाचे ढीग जमा झाले आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्ट/मुंबई मेरिटाइम बोर्ड प्राधिकरणाने बांबू विक्रेत्यांना भाडय़ाने दिलेल्या जागेवरही मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. शिवाय या किनाऱयावर सुरक्षाव्यवस्थेचाही अभाव आहे. त्यामुळे संबंधित परिसरात फौजदारी गुह्यांचे प्रमाणही वाढले आहे. तसेच धूपप्रतिबंधक बंधाऱयाचे नुकसानही मोठय़ा प्रमाणात झाले आहे. या पार्श्वभूमीवर माहीम बीचचे सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामासाठी 2 कोटी 91 लाख 80 हजार 134 रुपये खर्च करणार आहे.
असे होणार काम
सुमारे 2.5 किमी समुद्रकिनारा असणाऱया माहीम बीचच्या सौंदर्यीकरणात अतिक्रमण हटवणे आणि स्वच्छतेचे काम केले जाणार आहे. यामध्ये किनाऱयालगत अद्ययावत उद्यान विकसित करण्यात येणार आहे.
शिवाय चालण्यासाठी आकर्षक पायवाटा तयार करण्यात येणार आहेत. शिवाय धूपप्रतिबंधक बांधकामांची डागडुजी करण्यात येणार असून पोलीस वसाहतीची संरक्षक भिंत उभारणे, किनाऱयावर समुद्राची वाळू पुरवणे अशी कामे केली जाणार आहेत.
सहा महिन्यांत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. या कामासाठी मे. राजदीप एंटरप्रायझेसला कंत्राट देण्यात येणार असून याबाबतचा प्रस्ताव आगामी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.





























































