प्लॅस्टिकबंदीची २० लाखांची दंडवसुली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

राज्यभरात २३ जूनपासून १०० टक्के प्लॅस्टिकबंदी लागू झाल्यानंतर या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी पालिकेने धडक मोहीम हाती घेतली आहे. पालिकेच्या सर्व २४ वॉर्डांमध्ये प्लॅस्टिकबंदीविरोधात जोरदार कारवाई सुरू आहे. प्लॅस्टिकबंदीनंतर नवव्या दिवशी वसूल केलेल्या दंडाचा आकडा तब्बल २० लाखांवर गेला आहे. यामध्ये दीड हजार किलोंहून जास्त प्लॅस्टिक जप्तही करण्यात आले आहे.

पर्यावरण वाचवण्यासाठी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या पाठपुराव्यानंतर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी राज्यभरात प्लॅस्टिकबंदी जाहीर केली. मुंबईसह संपूर्ण राज्यात या निर्णयाचे जोरदार स्वागत झाले. नागरिकांनी दैनंदिन जीवनात कापडी पिशव्या वापरण्यास सुरुवात केली आहे. मात्र मुंबईत अनेक दुकानदार-व्यापाऱ्यांकडून प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने तयार केलेल्या २००पेक्षा जास्त निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली प्लॅस्टिक आढळल्यास दंडवसुली करण्यात येत आहे. दरम्यान, कारवाईदरम्यान काही ठिकाणी विरोधही होत असल्याने ४९ प्रकरणे न्यायालयात प्रलंबित ठेवण्यात आली.