पब्जीत 10 लाख गमावल्याने लहानग्याने घर सोडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पब्जीचे व्यसन लागलेल्या एका लहान मुलाने विविध टास्कच्या नादात 10 लाख रुपये खर्च केले. पैसे खर्च केल्याचा जाब वडिलांनी विचारल्याने त्याने भीतीपोटी चिठ्ठी ठेवून घर सोडले. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट-10 ने अवघ्या बारा तासांत शोधून काढले. त्याला पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

हा मुलगा जोगेश्वरी परिसरात राहतो. कोविड काळात ऑनलाइन शाळा असल्याने तो अभ्यासासाठी आईचा मोबाईल वापरत होता. मोबाईल सतत हातात असल्याने तो पब्जी गेमच्या आहारी गेला होता. या गेममध्ये असणाऱया विविध टास्कच्या नादात त्याने आईच्या खात्यातील 10 लाख रुपये खर्च केले. बँक खात्यातून पैसे कमी झाल्याचे त्याच्या वडिलांच्या निदर्शनास आल्याने वडिलांनी त्याला जाब विचारला. वडिलांच्या भीतीने तो घरातून निघून गेला. जाताना त्याने ‘जोपर्यंत पैसे कमवत नाही तोपर्यंत घरी परत येणार नाही’अशी चिठ्ठी लिहिली. मुलगा घरातून गेल्याने त्याच्या आईवडिलांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्या प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे शाखेची युनिट-10 ने केला. प्रभारी पोलीस निरीक्षक महेश ठाकूर यांच्या पथकातील सहायक निरीक्षक धनराज चौधरी, जगदीश धारगळकर, दिलीप माने यांनी तपास केला. पोलिसांनी अंधेरी परिसरात त्या मुलाला ताब्यात घेतले.

तीन महिन्यांपासून झाला गेम ऍडिक्ट

तो मुलगा पब्जी खेळताना पैसे वजा झाल्यासंदर्भात बँकेचे आलेले एसएमएस डिलीट तर कधी हाईड करत असायचा. त्यामुळे बँक खात्यातून पैसे गेल्याचे त्याच्या आईवडिलांना समजत नव्हते.

दोन वर्षांत 54 मुलांचा शोध

विविध कारणास्तव घरातून निघून गेलेल्या किंवा अपहरण झालेल्या 54 मुलांना युनिट 10 ने गेल्या दोन वर्षांत शोधून काढले. अपहरण झालेल्यांमध्ये बहुतांश मुली असून पोलिसांनी 10 आरोपींना अटक केली आहे.