
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळणे अत्यंत आवश्यक आहे. गणेशोत्सव यंदा साधेपणाने साजरा होत आहे. आगमन, विसर्जन मिरवणुकांना मनाई करण्यात आली आहे. त्यानंतरही गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. गर्दीला आळा घालण्यासाठी मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. 10 सप्टेंबर गणेश चतुर्थी ते 19 सप्टेंबर अनंत चतुर्दर्शीपर्यंत ही जमावबंदी असणार आहे. या कालावधीत पाचपेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्रित जमता येणार नाही. रस्त्यांवरच नव्हे तर इमारतींच्या आतील परिसरातही हा नियम कटाक्षाने पाळावा लागणार आहे अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट येऊ द्यायची नसेल तर यंदाचा गणेशोत्सवदेखील आपल्याला शासनाच्या नियमांचे पालन करूनच साजरा करावा लागणार आहे. गणेशोत्सव मंडळांनी गर्दी टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी, याची माहिती पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली.
गणेशोत्सवात आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठय़ा संख्येने घराबाहेर पडतात. पण कोरोनाचा धोका लक्षात घेता गर्दी केलेली चालणारी नाही. ती सर्वांच्या आरोग्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे 10 ते 19 सप्टेंबरदरम्यान सार्वजनिक ठिकाणी कलम 144 नुसार पाच पेक्षा अधिक नागरिक एकत्र जमणार नाहीत. पण तरीसुद्धा कोणी नियमांचे पालन केले नाही तर संबंधितांवर कलम 188 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
– चैतन्य एस. (उपायुक्त, प्रवक्ता)
भाविकांना आवाहन
– गणेश मंडपाच्या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करू नये. ऑनलाइन दर्शन घ्यावे. प्रत्यक्ष दर्शन अथवा मुखदर्शन घेण्याचा मोह टाळावा. n पाच पेक्षा जास्त नागरिकांनी एकत्र जमू नये. संशयास्पद गोष्ट दिसल्यास त्वरित तैनात असलेल्या पोलिसांना अथवा 100 क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी. n लहान बालके व वृद्धांना गणेश मंडपाजवळ घेऊन जाऊ नये. n कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हातभार लावावा.
असे आहेत नियम
भाविकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही याची काळजी घ्या.
ऑनलाइन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी.
आगमन व विसर्जन मिरवणूक काढू नका.
मुखदर्शनाची मुभा देऊ नये. सांस्कृतिक कार्यक्रम करू नये.
सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक काळजी घ्या.
गणेशमूर्तीच्या पूजेकरिता पाच तर विसर्जनाकरिता दहा जणांना सहभागी करून घ्यावे. ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांनाच सहभागी करून घ्यावे.






























































