शिवडीचे क्षयरोग रुग्णालय हायटेक होणार, वेळीच चाचणी, जलद निदान, अद्ययावत सेवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आशियातील सर्वात मोठय़ा आणि पालिकेच्या शिवडी येथील विशेष क्षयरोग रुग्णालयात वेळीच चाचणी, जलद निदान आणि अद्ययावत सेवा देण्यासाठी प्रयोगशाळेचे अत्याधुनीकरण करण्यात येणार आहे. यामुळे टीबी आणि ड्रग रेझिस्टंट टीबी या संसर्गजन्य साथीच्या आजारांची जलद चाचणी व निदान करणे शक्य होणार आहे. यासाठी पालिका सुमारे 2 कोटी 28 लाखांचा खर्च करणार असून याबाबतच्या प्रस्तावाला बुधवारी स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

क्षयरोग रुग्णांना डीआरटीबीचे निदान करण्यासाठी सध्या केवळ जे.जे. रुग्णालयामधेय एक राज्यस्तरीय क्षयरोग प्रयोगशाळा आहे. त्यामुळे मुंबईत डीआरटीबीची रोगनिदान क्षमता वाढवण्यासाठी राज्यस्तरावर शिवडी टीबी रुग्णालय व चिंचपोकळीचे कस्तुरबा रुग्णालय ही दोन रुग्णालये निवडण्यात आली आहेत. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाने क्षयरोग रुग्णालयाच्या विस्तारित इमारतीत तळमजल्यावरील प्रयोगशाळेचे अद्ययावतीकरण करून क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईत दरवर्षी 4 हजार टीबी रुग्णांची नोंद

पालिकेचे शिवडी येथील क्षयरोग रुग्णालय हे आशिया खंडातील सर्वात मोठे विशेष क्षयरोग रुग्णालय आहे. या रुग्णालयात दररोज अंदाजे 100 ते दीडशे रुग्णांसाठी 24 तास बाह्यरुग्ण विभाग आणि औषध प्रतिरोधक क्षयरोग (डीआरटीबी) रुग्णांसाठी विशेष बाह्य रुग्ण विभाग चालवला जातो. रुग्णालयात दररोज अंदाजे 50 ते 60 रुग्ण दाखल होत असतात. तर दरवर्षी मुंबईत 4000 एमडीआर टीबी रुग्णांची नोंद होते. मुंबईतील औषध प्रतिरोधक क्षयरोग रुग्णांचा भार जागतिक सरासरीपेक्षा जास्त आहे.