
सामना प्रतिनिधी । मुंबई
शिवसेनेच्या विकासकामांना कौल देत मागील 2014 लोकसभा निवडणुकीत मतदारांनी शिवसेना नेते-खासदार गजानन कीर्तिकर यांना भरघोस मतांनी निवडून दिले. मतदारांचा हा विश्वास सार्थ ठरवीत म्हाडा वसाहती, झोपडपट्टय़ांचा पुनर्विकास, सीआरझेडचा प्रश्न मार्गीं लावत जुन्या इमारतींचा खुला केलेला पुनर्विकास, सुखकर रेल्वे प्रवास अशा एक ना अनेक विकासकामांना गती देण्यात आली. या विकासकामांवर मतदारराजा खूश असून 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही उत्तर पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचाच विजय हमखास मानला जात आहे.
मतविभाजन टळणार
या विभागात शिवसेनेला मिळणाऱया मतांचे विभाजन होण्याची शक्यताही मावळली आहे. मागील वेळी मनसेकडून चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांना या ठिकाणी तिकीट देण्यात आले होते, मात्र तेव्हाही मतदारांनी शिवसेनेलाच पसंती दिली. मागील निवडणुकीत सपाटून पराभव झाल्यानंतर आता लोकसभा निवडणुकीत उभे न राहण्याचा मनसेने निर्णय घेतला आहे. त्यामुळे या मतदासंघातील संभाव्य मतांचे विभाजनही टळणार आहे.
विकासकामांची जंत्री
खासदार गजानन कीर्तिकर यांनी मतदारसंघातील अनेक विकासकामांना गती दिली. पश्चिम रेल्वेवर सुरू राममंदिर स्थानकाचे काम वेगाने पूर्ण करण्यात आले. अंधेरी ते गोरेगाव हार्बर लाइनचे विस्तारीकरण करण्यात येऊन येथील बाधित झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसनही करण्यात आले. धोकादायक आंबोली रेल्वे क्रॉसिंगच्या जागेवर उड्डाणपूल उभारण्यात आला. वर्सोवा खाडीतील गाळ उपसण्याच्या कामासाठी केंद्राकडून 80 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. विमानात महिलांसाठी तीन आसने आरक्षित व्हावीत यासाठी पाठपुरावा करून तो मार्गी लावला.
काँग्रेसमध्ये उमेदवारीचाच घोळ
शिवसेनेपाठोपाठ या मतदारसंघातील प्रबळ उमेदवार मानले जाणारे काँग्रेस नेते गुरुदास कामत यांच्या अकाली निधनामुळे या विभागातील काँग्रेस कार्यकर्ते सैरभैर आहेत. या मतदारसंघातून संजय निरुपम हे उमेदवारीसाठी इच्छुक असले तरी सच्च्या काँग्रेसी कार्यकर्त्यांचा त्यांना कडाडून विरोध आहे. संजय निरुपम यांच्यामुळे कामत यांना झालेला मनःस्ताप येथील सच्चा काँग्रेस कार्यकर्ते विसरलेले नाहीत. त्यातच काँग्रेस हायकमांडही त्यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यास फारसे उत्सुक नाही. दुसरीकडे इथून निवडणूक लढविण्यासाठी कृपाशंकर सिंह यांनीही दिल्लीदरबारी जोरदार प्रयत्न केले आहेत. जिल्हा काँग्रेस कमिटीकडून मात्र माजी मंत्री सुरेश शेट्टी यांच्या नावाची शिफारस या मतदारसंघासाठी केली आहे. अशा विभागलेल्या मनःस्थितीत काँग्रेस कार्यकर्ते असल्याने त्याचा लाभ निश्चितच शिवसेनेच्या उमेदवाराला होणार आहे.



























































