
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबई विभागातून परीक्षा देणाऱया दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या यंदा 31 हजार 80 ने कमी झाली आहे. 3 लाख 57 हजार 55 विद्यार्थ्यांनी यंदा परीक्षा दिली होती. यांपैकी 2 लाख 75 हजार 71 विद्यार्थींच उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षी परीक्षेला बसलेल्या 3 लाख 38 हजार 609 विद्यार्थ्यांपैकी 3 लाख 6 हजार 151 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे निकालाचा पाराही 90.41 वरून थेट 77.04 वर घसरला आहे.
75 टक्क्यांवर जास्त गुण मिळविणाऱया विद्यार्थ्यांची संख्यादेखील कमी झाली आहे. केवळ 57 हजार 284 विद्यार्थीच या गटात आहेत. गेल्या वर्षी हे विद्यार्थी 84 हजार 788 इतके होते. त्यामुळे आता प्रवेशासाठीच्या स्पर्धेला विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागणार आहे. मुंबई विभागात पश्चिम उपनगरचा निकाल सर्वाधिक 79.59 टक्के इतका लागला आहे. त्याखालोखाल ठाणे 78.55, दक्षिण मुंबई 77.81, रायगड 76.78, पूर्व उपनगर 76.06 आणि पालघर विभागाचा सर्वात कमी म्हणजेच 71.75 असा निकाल लागला आहे.
मुंबईतील रिपीटर्सचा निकाल 28.26 टक्के
16 हजार 33 रिपीटर्स विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. या विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 28.26 इतकी आहे. रिपीटर्सपैकी 3 विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये 25विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 51 विद्यार्थी द्वितीय तर 4452 विद्यार्थी पास श्रेणीत असे एकूण 4531 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
युवासेनेचे भाकीत खरे ठरले
तोंडी परीक्षा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना सीबीएसई, आयसीएसई विद्यार्थ्यांच्या तुलनेत कमी गुण मिळतील. एसएससीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता घसरेल असे भाकीत युवा सेनेने वर्तविले होते. तोंडी परीक्षा रद्द करणाऱया शालेय शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली 31 जानेवारीला राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे कार्यालयावर मोर्चादेखील काढण्यात आला होता. तसेच शिक्षणमंत्र्यांना निवेदनदेखील देण्यात आले होते.
अक्षित जाधवला सर्व विषयात 35 टक्के
अक्षित जाधव हा विद्यार्थी सर्व विषयांत 35 टक्के गुणांसह उत्तीर्ण झाला आहे. अक्षित मीरा रोड येथील शांती नगर शाळेचा विद्यार्थी आहे. त्याच्या निकालाने सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. अभ्यासात सामान्य असलेला अक्षित पहिल्याच वेळेस पास झाल्याने त्याच्या कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.



























































