
मार्च महिना सुरू होताच उन्हाची रखरख कमालीची वाढली आहे. याचदरम्यान उशिरापर्यंत मुक्कामी राहिलेल्या थंडीनेही काढता पाय घेतला आहे. अचानक हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढून कमाल तापमानाचा पारा मोठी उसळी घेऊ लागला आहे. गुरुवारी मुंबईचे कमाल तापमान थेट 37 अंशांवर झेपावले. त्यामुळे मुंबईकर चांगलेच घामाघूम झाले.
मागील दोन दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण राज्यभरात उकाडा वाढला आहे. बुधवारी मुंबईचा पारा 35 अंशांवर होता. गुरुवारी पाऱयाने आणखी कहर केला आणि सरासरीपेक्षा 4 अंशांची वाढ होऊन सांताक्रूझमध्ये 37.1 अंश कमाल तापमान नोंद झाले, तर किमान तापमान 2 अंशांनी वाढून 22.2 अंशांवर गेले. कुलाब्यातही दोन अंशांची वाढ झाली.



























































