मुंबई-ठाणे मेट्रो धावणार ‘मॉल टू मॉल’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
657 किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पांच्या मार्गाचे काम सुरू आहे. 300 किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे

सामना प्रतिनिधी । ठाणे

ठाणेकर प्रतीक्षा करत असलेल्या मुंबई-ठाणे मेट्रोचे काम वेगात सुरू आहे. मात्र ही मेट्रो ‘मॉल टू मॉल’ पळवण्याचा घाट घातला जात असून तसा डीपीआर तयार करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. भांडुपच्या ड्रिम्स, मुलुंडच्या मॅग्नेट, निर्मल तर ठाण्याच्या इटर्निटी, कोरम, विवियाना, आर मॉल अशा तब्बल आठ मॉलसमोर मेट्रोला स्थानके देण्यात येणार आहेत. त्यामुळे ही मेट्रो सर्वसामान्य प्रवाशांसाठी की हौशी शॉपर्ससाठी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

वडाळा-कासारवडवली मेट्रो-4 ला सुरुवात झाली असून काही वर्षांतच ठाणेकरांचे मेट्रोचे स्वप्न पूर्ण होणार आहे. मेट्रो प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई ते ठाणेदरम्यान सुमारे 30 स्टेशन्स असणार आहेत. यामध्ये 13 स्टेशन्स ठाण्यात तर 17 स्टेशन मुंबईत आहेत. मात्र भांडुप ते ठाण्यापर्यंतची सुमारे आठ स्थानके ही मॉलसमोर उभारण्याचा विचार सुरू आहे. मेट्रोच्या डीपीआरनुसार भांडुपच्या ड्रिम्स मॉल, मुलुंडच्या निर्मल, लाइफस्टाइल, मॅग्नेट तर ठाण्यात इटर्निटी, कोरम, विवियाना आणि आर मॉलसमोर मेट्रोला स्टेशन देण्यात येणार आहे. याचा फायदा मॉलमध्ये शॉपिंग करणाऱ्या हौशींना होणार असला तरी ऑफिस, घर गाठण्यासाठी भागम्भाग करणाऱ्या सामान्य कर्मचाऱ्यांची निराशा होणार आहे.

एमएमआरडीएचा पर्दाफाश
मेट्रोसंदर्भात म्यूज संस्था आणि नागरिक प्रतिष्ठानने एक सर्व्हे केला. या सर्व्हेत एक हजार ठाणेकरांची मते नोंदवून अहवाल तयार करण्यात आला. या सर्वेक्षणादम्यान एमएमआरडीएच्या या कारभाराचा पर्दाफाश झाला. म्यूज संस्थेचे अधिकारी निशिकांत बंगेरा यांनी केलेल्या सर्वेक्षणात ‘मॉल टू मॉल’ मेट्रोला ठाणेकरांनी फारशी पसंती दर्शवलेली नाही. त्यामुळे मेट्रो असूनही येथील प्रवासी रेल्वे, बस, रिक्षानेच प्रवास करतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.