
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि बेताल वक्तव्य करणाऱया केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात मुंबई, ठाणे, रायगडसह राज्यभरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. राज्यभरात अनेक ठिकाणी राणे यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.
ठाणे मनोरुग्णालयात केसपेपर काढला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बेताल वक्तव्य करणारे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे मानसिक संतुलन बिघडल्याने आज ठाण्यातील शिवसैनिकांनी मनोरुग्णालयात जाऊन त्यांच्या नावाचा केसपेपर काढला. त्यांना या हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यास उपचाराचा सर्व खर्च शिवसेना करेल, असा उपरोधिक टोलादेखील लगावण्यात आला. दरम्यान, संतप्त शिवसैनिकांनी तसेच युवासैनिकांनी मेंटल हॉस्पिटलच्या बाहेर हातात काेंबड्या घेऊन आंदोलन केले. तर ठाणे शहरात विविध ठिकाणी निदर्शने करीत शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. महापौर नरेश म्हस्के, विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात जाऊन नारायण राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.
डोंबिवलीत काेंबड्या उडवल्या
डोंबिवलीतील इंदिरा गांधी चौकात शहरप्रमुख राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्या पुतळ्याला जोडे मारले. तर शिवसैनिकांनी काेंबड्या उडवत ‘चोर.. चोर..’ अशा घोषणा देऊन आपला रोष व्यक्त केला.
पेणमध्ये जोडे मारो
भाजपचा नाचरा मोर.. नारायण राणे काेंबडी चोर, अशा घोषणा देत पेणमधील शिवसैनिकांनी त्यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन केले. उपजिल्हाप्रमुख नरेश गावंड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात असंख्य शिवसैनिक सहभागी झाले होते. नवी मुंबईत जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. उल्हासनगरात भाजपचे नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांना काळे फासण्यात आले. चिरनेर, पाली, मुरुड, खालापूर, महाड, वसई, पनवेल, पालघर, भिवंडी, टिटवाळा, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत येथेही शिवसैनिकांच्या संतापाचा स्फोट झाला.
नाशिक जिह्यात राणेंविरुद्ध तीन गुन्हे दाखल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱया केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरुद्ध नाशिक जिह्यात प्रचंड संतापाची लाट उसळली. ‘काेंबडी चोर हाय हाय’च्या घोषणा देत राणे यांच्या पुतळ्याचे ठिकठिकाणी दहन करण्यात आले. दरम्यान, वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राणे यांच्याविरुद्ध नाशिक, दिंडोरी, मालेगावात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संतप्त शिवसैनिकांनी नाशिक भाजप कार्यालयावर दगडफेक केली. शिवसेना कार्यालयाकडे येणाऱया भाजप कार्यकर्त्यांना दगडाचा प्रसाद देत शिवसैनिकांनी पिटाळून लावले.
नाशिक जिल्हा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर राणेंच्या वक्तव्याचा जोरदार निषेध करण्यात आला. चपला मारून राणेंच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. मालेगाव येथे शिवसैनिक आणि महिला आघाडीने निदर्शने करून निषेध केला, पुतळ्याचे दहन केले. राणे यांना त्वरित अटक करावी, केंद्रीय मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी नाशिक जिल्हा संपर्पप्रमुख भाऊ चौधरी, उपनेते बबनराव घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सुनील पाटील, आमदार नरेंद्र दराडे, माजी आमदार वसंत गीते, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, माजी महापौर विनायक पांडे, माजी आमदार योगेश घोलप आदींसह शिवसैनिक हजर होते.
नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी नारायण राणेंविरुद्ध फिर्याद दिली. यात शिवसेना नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते हे साक्षीदार आहेत. मालेगावात सुनील देवरे यांनी, तर दिंडोरी येथे शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांनी राणेंविरुद्ध तक्रार दिली. मुख्यमंत्र्यांचा अवमान केला, त्यांच्या पदाची प्रतिमा मलीन केली, समाजात तेढ निर्माण केली म्हणून राणेंविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला.
कोर्टात हजर करून कारवाई -पोलीस आयुक्त
नाशिक शहरात सायबर क्राइममध्ये शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या फिर्यादीने आणि विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्या साक्षीने नारायण राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी सांगितले.
























































