आजपासून बीकॉमची परीक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी | मुंबई

63 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी; 396 परीक्षा केंद्र

मुंबई विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणारी बी.कॉम सत्र 6 ची परीक्षा बुधवार दि 3 एप्रिलपासून सुरू होणार आहे. एकूण 62 हजार 325 विद्यार्थी या परीक्षेला बसणार असून 396 परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार आहे.

दरवर्षी बी.कॉमच्या परीक्षेनेच विद्यापीठाचे उन्हाळी सत्र सुरू होते. यापूर्वी 25 मार्चपासून प्रथम सत्राच्या परीक्षा सुरू झाल्या, पण त्या परीक्षा पुनर्परीक्षार्थी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या होत्या. बी.कॉम सत्र 6 च्या सुधारित अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी 56 हजार 774 विद्यार्थी बसले असून यामध्ये मुलींची संख्या लक्षणीय आहे. या परीक्षेस 29 हजार 958 विद्यार्थिनी असून 26 हजार 816 विद्यार्थी आहेत. तसेच 75 25 पॅटर्नचे 5 हजार 551 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. 25 एप्रिलपर्यंत ही परीक्षा सुरू राहणार आहे. सदर परीक्षा मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पालघर या जिह्यांच्या तसेच राज्याबाहेरील सिलव्हासा या केंद्रशासित प्रदेशातील एक परीक्षा केंद्र असे एकूण 396 परीक्षा केंद्रांवर घेतल्या जाणार आहेत. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी या परीक्षेच्या आयोजनाचा आढावा घेतला.

बी.कॉमला सहा विषय; 100 गुणांची परीक्षा
2019-20 या शैक्षणिक वर्षापासून बी.कॉमच्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात आली आहे. या परीक्षेपासून बी.कॉम सत्र 6 ला एकूण सहा विषय असतील. तसेच प्रश्नपत्रिका 100 गुणांची असेल. परीक्षेचा कालावधी 3 तासांचा असून ही परीक्षा सकाळी 10.30 वाजता सुरू होऊन दुपारी 1.30 वाजता संपणार आहे.

निकाल वेळेत जाहीर होईल
बी.कॉमची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आहे. या परीक्षेचा निकाल वेळेत लावण्याचा विद्यापीठ प्रयत्न करणार आहे. ही परीक्षा देणाऱया सर्व विद्यार्थ्यांना माझ्या शुभेच्छा.’.
– डॉ. सुहास पेडणेकर

दोन विषयांच्या परीक्षा व मूल्यांकन महाविद्यालयाकडे
बी.कॉम सत्र 5 व 6 च्या अभ्यासक्रमातील क्षमता संवर्धन अभ्यासक्रम (Ability Enhancement Course – AEC ) या समूहातील दोन विषयांच्या परीक्षा व मूल्यांकन महाविद्यालय स्तरावर होणार आहे. विद्यार्थ्यांनी या दोन पेपरच्या परीक्षेसाठी आपल्या महाविद्यालयात जाऊन परीक्षा द्यावि. निकालानंतर सदर दोन विषयांच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन व छायाप्रतदेखील विद्यापीठाच्या वतीने महाविद्यालयांना देण्यात येतील.