मुंबई विद्यापीठातील अत्यंत महत्त्वाचा असलेला परीक्षा विभाग पूर्णवेळ जनसंपर्क अधिकाऱयाच्या (पीआरओ) प्रतीक्षेत आहे. पूर्णवेळ पीआरओ नसल्याने परीक्षा विभागात विविध माहिती घेण्यासाठी येणाऱया विद्यार्थी आणि पालकांची गैरसोय होत आहे. याशिवाय परीक्षा विभागाकडून विद्यार्थ्यांना आणि महाविद्यालयांना वेळोवेळी द्यावी लागणारी माहितीही पीआरओअभावी पोहोचत नाही. त्यामुळे तातडीने पूर्णवेळ पीआरओ नेमण्यात यावा अशी मागणी युवा सेनेने केली आहे.
युवा सेनेचे मुंबई विद्यापीठातील सिनेट सदस्य अॅड. वैभव थोरात यांनी यासंदर्भात कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांना पत्र दिले आहे. मागील आठ ते दहा वर्षांपासून विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे पूर्णवेळ पीआरओ नाही. पूर्णवेळ पीआरओ म्हणून नेमणूक असूनही आशुतोष राठोड हे गेली आठ-दहा वर्षे सतत प्रतिनियुक्तीवर असल्याने दुसर्या विभागाच्या पीआरओंकडे अतिरिक्त कारभार दिला जातो. त्यामुळे विद्यार्थी आणि महाविद्यालयांच्या हितासाठी पूर्णवेळ पीआरओ नेमण्यात यावा आणि त्यांना परीक्षा विभागाच्या तळमजल्यावरच केबिन देण्यात यावी अशी मागणी अॅड. थोरात यांनी या पत्रात केली आहे.






























































