महापालिकेकडून ओसी मिळविण्यास  मुंबई विद्यापीठाची चालढकल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील इमारतींना ओसी मिळविण्यास विद्यापीठ प्रशासन चालढकलपणा करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. आठ महिन्यांपूर्वी मुंबई महापालिकेने पत्र पाठवून कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांना प्रत्येक इमारतीच्या वैयक्तिक प्रस्तावाची ओसी मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या अनुपालनांची यादी पाठविली होती. मात्र आजतागायत विद्यापीठाकडून आवश्यक पूर्ततेसह ओसी देण्याचा कोणताही प्रस्ताव महापालिकेकेडे आलेला नाही.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली मागील दोन वर्षांपासून ओसी प्रकरणाबाबत मुंबई विद्यापीठ आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे पाठपुरावा करत आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील 38 इमारतींच्या ओसीबाबत विकास व नियोजन खात्याच्या विशेष कक्षाचे कार्यकारी अभियंता यांनी अनिल गलगली यांना दिलेल्या माहितीत आजतागायत विद्यापीठ प्राधिकरणाकडून आवश्यक पूर्ततेसह ओसी देण्याचा कोणताही प्रस्ताव मिळाला नसल्याचे उघड झाले आहे. ऑनलाइन प्रणालीद्वारे ओसीसाठी वैयक्तिक प्रस्ताव विद्यापीठाकडून सल्लागार व वास्तुविशारद यांच्याकडून मिळाल्यानंतर ओसी देण्याच्या प्रस्तावावर त्याच्या गुणवत्तेनुसार प्राधान्याने प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरातील 63 पैकी 38 इमारतीस ओसी नसल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई विद्यापीठाने दिली होती. या इमारती वर्ष 1975 पासून वर्ष 2017 दरम्यान बांधण्यात आलेल्या आहेत. एकूण 63 इमारतींपैकी फक्त 25 इमारतींना ओसी मिळाली असून 38 इमारतींना ओसी अद्यापपर्यंत मिळाली नाही. ओसी नसलेल्या इमारतीत हजारो विद्यार्थी आणि विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचारी वृंद यांची ये-जा असून मंजूर आराखडाप्रमाणे काम झाले नसून एफएसआय उपलब्ध असल्यामुळे सुधारित आराखडा सादर करण्याची आवश्यकता आहे. ऑटोडीसीआर ऑनलाइन प्रणालीमार्फत आवश्यक कागदपत्रे सादर केल्यास ओसी मिळवली जाऊ शकते. मात्र कुलगुरूच लक्ष देत नसल्याने आता याप्रकरणी कुलपती आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री यांनी कारवाई करण्याची मागणी अनिल गलगली यांची आहे.