‘व्हय़ूइंग गॅलरी’तून पहा मुंबईचे वैभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> देवेंद्र भगत

अथांग समुद्राची अनुभूती, नरीमन पॉइंट येथील क्वीन नेकलेसची नजाकत, हेरिटेज वैभव आणि सनसेट पॉइंटसह गगनचुंबी इमारतींची श्रीमंती गिरगाव चौपाटीवरील ‘ह्यूइंग गॅलरी’तून पाहण्याची संधी मुंबईकरांना लवकरच मिळणार आहे. पालिकेच्या माध्यमातून गिरगाव चौपटीजवळ समुद्रात सुमारे 40 मीटर अंतरापर्यंत ही गॅलरी बांधण्यात येणार आहे. ऍम्पी थिएटरच्या स्वरूपात बांधण्यात येणाऱया या गॅलरीच्या ठिकाणी एका वेळी 50 पर्यटकांना बसण्याची व्यवस्था असेल.

मुंबईत गिरगाव, दादर, माहीम, जुहू, वर्सोवा, अक्सा आणि गोराई अशा प्रमुख चौपाटय़ा आहेत. पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून कार्यक्षेत्रातील चौपाटय़ांचे सौंदर्यीकरण आणि विकास करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये मुंबईतील सर्वात लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध गिरगाव चौपाटीवर तांबे चौकाजवळील पोलीस चौकीनजीक पालिका लवकरच ह्युईंग गॅलरी तयार करणार आहे. या ठिकाणाहून क्विन्स नेकलेस, अथांग समुद्र आणि गणेश विसर्जनही पाहता येणार आहे. यासाठी पालिकेकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. या ‘ह्युईंग गॅलरी’साठी उच्च न्यायालयाने नेमलेल्या ‘हायपॉवर कमिटी’ची परवानगी मिळाली असून लवकरच निविदा प्रक्रिया राबवून काम सुरू केले जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

या गॅलरीतून अथांग समुद्र, भरती ओहोटी न्याहाळता येणार असून वांद्रेपर्यंतचा समुद्रकिनाराही पाहता येणार आहे. पर्जन्य जलवाहिन्यांचा आऊटफॉल असलेल्या ठिकाणी ही गॅलरी बांधली जाणार आहे. त्या काळात मुंबईतील कापड गिरण्याचे पाणी समुद्रात सोडण्यासाठी हा आऊटफॉल बांधण्यात आला होता. मात्र सध्या हा आऊटफॉल बंद अवस्थेत असला तरी पर्यटक, मुंबईकरांची या ठिकाणी ये-जा असते.

दादर चौपाटीवरही गॅलरी

मुंबईच्या चौपाटय़ांमधील आकर्षण असलेल्या दादर चौपाटीवर चैत्यभूमीच्या मागील बाजूस ‘ह्यूइंग गॅलरी’ तयार करण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या कामासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या मिळाल्या असून पालिकेने निविदाही मागवल्या आहेत. या कामासाठी पालिका 3 कोटी 61 लाख 80 हजार रुपये खर्च करणार आहे.