
महाराष्ट्राचा आघाडीचा दुहेरीचा बॅडमिंटनपटू 23 वर्षीय विघ्नेश देवळेकरने आपल्या कारकीर्दीतला सर्वोत्तम परफॉर्मन्स नोंदवताना जोधपूर (राजस्थान) व पुणे (महाराष्ट्र) येथे झालेल्या अखिल भारतीय खुल्या सीनियर रँकिंग स्पर्धांमध्ये प्रथम मिश्र दुहेरी व पाठोपाठ पुरुष दुहेरी अशा गटांमध्ये सुवर्ण पदके पटकावत साऱयांचेच लक्ष वेधून घेतले. ठाणे महापालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेत गेल्या 10 वर्षांपासून प्रशिक्षण घेत असलेल्या विघ्नेशने प्राजक्ता सावंत व दीप रांभियाच्या साथीने जबरदस्त कामगिरी केली हे विशेष! आंतरराष्ट्रीय खेळाडू प्राजक्ता सावंत, विघ्नेश देवळेकर व पुरुष दुहेरीमध्ये उगवता तारा दीप रांभिया हे तिन्ही खेळाडू सय्यद मोदी ऍकॅडमीमध्ये श्रीकांत वाड तसेच अक्षय देवलकर व मयूर घाटणेकर या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत.
अव्वल स्थानावर झेप
या जेतेपदामुळे विघ्नेश देवळेकर बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय क्रमवारीमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे. तर पुरुष दुहेरीच्या अखिल भारतीय क्रमवारीतदेखील पहिल्या चार क्रमांकांमध्ये त्याने स्थान मिळवले आहे. विघ्नेशने या प्रसंगी आपल्या दोन्ही जोडीदारांचे तसेच ठाणे ऍकॅडमीचे आभार मानले.



























































