पश्चिम रेल्वेला पार्ल्यात पालिकेची जागा! विस्ताराला फायदा होणार, 312 चौ. मी. जागा देणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम रेल्वेच्या प्रस्तावित विस्तारासाठी पालिका विलेपार्ले येथील 312 चौरस मीटरची जागा देणार आहे. हा रस्ता वर्दळीचा असल्याने जागा रेल्वेला दिल्यास रस्त्याची रुंदी कमी होणार. परिणामी रस्तारेषा पूर्वेकडे सरकवावी लागणार असल्याने काही बांधकामे बाधित होणार आहेत. सध्या हा रस्ता 18.30 मीटर रुंदीचा आहे. पालिका आणि रेल्वेमध्ये याबाबत 2016पासून पत्रव्यवहार सुरू आहे.

मुंबई सेंट्रल ते बोरिवली स्थानकादरम्यान रेल्वे मार्गाच्या विस्तारकामात रेल्वेला या जागेचा उपयोग होणार आहे. जुन्या रेडिरेकनर दरानुसार या कामात रस्त्यासह नुकसानभरपाईची रक्कम 9 कोटींच्या वर जात होती. मात्र रेल्वेकडून वारंवार नुकसानभरपाईची रक्कम कमी करण्याची विनंती केली जात होती. यातच 2021मध्ये रेडिरेकनरमध्ये दर कमी करण्यात आल्याने आता ही रक्कम 7 कोटी 31 लाखांपर्यंत कमी आली आहे. ही जागा रेल्वेला हस्तांतरित करण्यासाठी पालिकेने सुधार समितीची परवानगी मागितली आहे. याबाबतचा प्रस्ताव आगामी सुधार समितीच्या बैठकीत मांडला आहे.

चार वर्षांनी प्रश्न मार्गी लागला

चार वर्षांपासून ही जागा हस्तांतरित करण्याबाबत पालिका, रेल्वे आणि राज्य सरकारमध्ये चर्चा, पत्रव्यवहार सुरू आहेत. 2016मध्ये पहिल्यांदा याबाबत पत्रव्यवहार झाला. त्यानंतर आता प्रत्यक्ष अंमलबजावणी होत आहे. त्यामुळे अखेर चार वर्षांनंतर या जागेच्या हस्तांतरणाबाबत प्रश्न मार्गी लागला आहे.